निवडणूक आयोगाने जारी केली नोटीस; 'राष्ट्रीय अंत्योदय काँग्रेस' पक्षाची नोंदणी रद्द का करू नये?

          ठाणे,दि.01(जिमाका) :-  केंद्रीय निवडणूक आयोगाने 'राष्ट्रीय अंत्योदय काँग्रेस' या राजकीय पक्षाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. गेल्या सहा वर्षांपासून, म्हणजे 2019 पासून या पक्षाने कोणतीही निवडणूक लढवलेली नाही. त्यामुळे, लोकप्रतिनिधित्व कायदा, 1951 च्या कलम 29 अ नुसार या पक्षाने राजकीय पक्षासारखे काम करणे थांबवले आहे, असे आयोगाला वाटते. याच कारणामुळे आयोगाने पक्षाची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कारवाई करण्यापूर्वी पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिली आहे.

निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डनुसार, 'राष्ट्रीय अंत्योदय काँग्रेस' पक्षाची स्थापना निवडणुकीत भाग घेण्यासाठी झाली होती. मात्र, 2019 पासून या पक्षाने लोकसभा, राज्य विधानसभा किंवा कोणत्याही पोटनिवडणुकीत एकही उमेदवार उभा केलेला नाही. यामुळे, हा पक्ष आता कलम 29 अ नुसार राजकीय पक्षाच्या निकषांचे पालन करत नाही, असे आयोगाचे म्हणणे आहे.

या नोटिशीला उत्तर देण्यासाठी पक्षाला 4 सप्टेंबर, 2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. पक्षाला लेखी स्पष्टीकरण, संबंधित कागदपत्रे आणि अध्यक्षांचे किंवा सरचिटणीसांचे प्रतिज्ञापत्र सादर करणे बंधनकारक आहे. या प्रकरणी 11 सप्टेंबर, 2025 रोजी मुंबईतील मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या दालनात सुनावणी होणार आहे. या सुनावणीला पक्षाच्या अध्यक्षांनी, सरचिटणीसांनी किंवा पक्षप्रमुखांनी हजर राहणे आवश्यक आहे. जर पक्षाने ठरलेल्या मुदतीत उत्तर दिले नाही किंवा सुनावणीला उपस्थित राहिले नाही, तर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी नोटीस निवडणूक आयोगाचे उप सचिव तथा सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आली आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”