सानपाडा नवी मुंबई पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
ठाणे,दि.25(जिमाका):- नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत सानपाडा येथील नूतन पोलीस ठाण्याच्या इमारतीचे कोनशिलेचे अनावरण व भव्य उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज संपन्न झाले.
या प्रसंगी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, पणन मंत्री जयकुमार रावल, सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, आमदार निरंजन डावखरे, मंदा म्हात्रे, प्रशांत ठाकूर, विक्रांत पाटील, प्रशांत ठाकूर, कुमार अयलानी, माजी खासदार संजीव नाईक, महाराष्ट्र गृह निर्माण व कल्याण महामंडळ (मर्या.) मुंबईच्या व्यवसायिक संचालक तथा पोलीस महासंचालक श्रीमती अर्चना त्यागी, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस सहआयुक्त संजय एन. पुरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त (नवी मुंबई) दीपक चाकोरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त (मुख्यालय) संजयकुमार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
अत्याधुनिक सुविधा उपलब्ध
नूतन इमारतीत पोलीस प्रशासनासाठी तसेच नागरिकांच्या सोयीसाठी अत्याधुनिक सेवा-सुविधांची उभारणी करण्यात आली आहे. तक्रारींचे तात्काळ निवारण व्हावे यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ई-संवाद कक्ष, साय-फाय कक्ष, अधिकारी कक्ष, लिपिक कक्ष, शस्त्रागार कक्ष, गुन्हे अन्वेषण कक्ष, पोलीस कोठडी, तडीपार गुन्हेगार कक्ष, अभिलेख कक्ष व मुद्देमाल कक्ष अशी विविध कक्षे उभारण्यात आली आहेत. या सुविधांमुळे पोलीस कामकाज अधिक गतिमान होणार असून नागरिकांशी संवाद अधिक प्रभावी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
पोलीस ठाण्यांना आयएसओ मानांकन
या कार्यक्रमावेळी वाशी पोलीस ठाणे, पनवेल तालुका पोलीस ठाणे व सीबीडी बेलापूर पोलीस ठाणे यांना ISO 9001 : 2015 या मानांकनाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. हे प्रमाणपत्र गुणवत्ता, कार्यक्षमता व पारदर्शकता सुनिश्चित करणारे असल्याने पोलीस विभागाच्या कामकाजाची विश्वासार्हता वर्धिष्णू ठरणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नूतन इमारतीच्या माध्यमातून नवी मुंबई पोलीस दलाला मिळणाऱ्या सुविधा व नागरिकांच्या सुरक्षेसाठी होणाऱ्या सकारात्मक बदलांबद्दल समाधान व्यक्त केले.
00000


Comments
Post a Comment