फळपिक विमा योजनेंतर्गत आंबिया बहारातील आंबा फळपिकासाठी सहभागाकरिता 30 नोव्हेंबर अंतिम मुदत

ठाणे,दि.09(जिमाका):- येत्या आंबिया बहारामध्ये विविध हवामान धोक्यामुळे आंबा फळपिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, याकरिता कृषी विभागामार्फत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना राबविण्यात येत आहे. योजनेमध्ये सहभागाकरिता दि.30 नोव्हेंबर 2025 अंतिम मुदत आहे. अवेळी पाऊस, कमी /जास्त तापमान, वेगाचा वारा, गारपीट या हवामान धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत सहभागी होऊन आंबा फळबागांचे संरक्षण करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे यांनी केले आहे.

योजनेची वैशिष्टे:-

ठाणे जिल्ह्यामध्ये अधिसूचित केलेल्या महसूल मंडळात आंबा पिकाच्या उत्पादनक्षम फळबागांना विमा संरक्षण देण्यात येईल. कर्जदार शेतकरी व बिगर कर्जदार शेतकरी यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक असेल. खातेदार शेतकरी व्यतिरिक्त कुळ व भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी यांनाही योजना लागू राहील. मात्र भाडेपट्टीने शेती करणाऱ्यास नोंदणीकृत (रजिस्टर्ड) भाडेकरार पिक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. या योजनेत प्रती शेतकरी सहभागासाठी कोकण विभागाकरिता एका फळपिकाखालील कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र 10 गुंठे (0.10 हे.) अशी मर्यादा राहील. तसेच जास्तीत जास्त क्षेत्र मर्यादा ही सर्व फळपिके व दोन्ही हंगाम मिळून प्रती शेतकरी 4 हे. मर्यादेपर्यंत राहील. विमा अर्जासोबत फळबागेचा Geo Tagging असलेला फोटो विमा पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य राहील. एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग व आंबिया बहारापैकी कोणत्याही एकाच बहाराकरीता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल.

ही योजना ठाणे जिल्ह्यामध्ये बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लि. (टोल फ्री नं. १८००२०९५९५९) मार्फत राबविण्यात येत आहे. फळपिक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याची अंतिम मुदत आंबा फळपिकाकरीता दि.30 नोव्हेंबर आहे. या फळपीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आणि विमा नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे बँक खाते आधार लिंक असावे. फळपिक विमा योजनेंतर्गत हवामान धोक्याचा ट्रिगर कार्यान्वित झाल्यास त्या महसूल मंडळातील त्या पिकासाठी भाग घेतलेल्या शेतकऱ्यास नुकसान भरपाई रक्कम संबंधित विमा कंपनीकडून देण्यात येणार आहे. विमा संरक्षण केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच लागू आहे. विहित वयापेक्षा कमी वयाच्या फळबाग लागवडीस विमा संरक्षणाची नोंद झाल्याचे पडताळणीत निदर्शनास आल्यास विमा संरक्षण केव्हाही संपुष्टात येईल आणि शेतकऱ्याने भरलेला विमा हप्ता जप्त होईल. योजनेत भाग घेण्यासाठी आंबा फळपिकाचे उत्पादनक्षम वय 5 वर्षे आहे. हवामान धोक्यांपैकी गारपीट (Add on cover) या हवामान धोक्यासाठीचा सहभाग ऐच्छिक राहिल व याकरिता अतिरिक्त विमा हप्ता देय आहे.

ज्या सर्वे नंबरसाठी व क्षेत्रासाठी पिक विमा काढण्यात आलेला आहे. त्या क्षेत्राच्या 7/12 उताऱ्यावर शेतकऱ्यांचे नाव नसणे, बोगस 7/12 व पिक पेरा नोंदीच्या आधारे पिक विम्याची बोगस प्रकरण करणे, दुसऱ्या शेतकऱ्यांचे शेतीवर परस्पर अधिकृत भाडेकरार न करता विमा काढणे, उत्पादनक्षमता वयाची फळबाग नसताना विमा काढणे, अशा बाबी निदर्शनास आल्यास अशा प्रकरणात अर्ज रद्द करून संबंधित दोषीवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. तसेच महसूल दस्तऐवजामध्ये फेरफार करून शासनाचे फसवणुकीच्या प्रयत्नाबाबत महसूल विभागामार्फत तहसिलदार यांच्याकडून स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येईल.

आंबा फळपिकासाठी निर्धारीत हवामान धोके, विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता दर पुढीलप्रमाणे:

हवामान धोके:- अवेळी पाऊस, कमी जास्त तापमान, वेगाचा वारा, गारपीट.

विमा संरक्षित रक्कम प्रति हे.:- 1 लाख 70 हजार मात्र.

विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा:- 17 हजार मात्र.

अधिक माहितीकरीता शेतकऱ्यांनी जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी किंवा विमा कंपनीशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”