नेरुळ येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथे दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न
ठाणे,दि.29(जिमाका):- नेरुळ येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथे दिवाळी अंक प्रदर्शन 2025 चे आयोजन ग्रंथालयातर्फे करण्यात आले असून त्याचे उद्घाटन नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले.
या प्रदर्शनात 102 विविध विषयांवरील दिवाळी अंक ठेवले असून, आठवडाभरासाठी आयोजित या दिवाळी अंक प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील, प्रा.माणिकराव कीर्तने वाचनालयाचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी, महापालिका नेरुळ विभाग अधिकारी डॉ.अनुराधा बाबर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय बनसोड, जेष्ठ नागरिक संघाच्या सार्वजनिक ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रभाकर गुमास्ते, सुनील आचरेकर, रुग्णसेवा केंद्राचे अध्यक्ष रणजीत दीक्षित, सेंट ऑगस्टीन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती समीरा माने, शब्दालय प्रकाशनाचे सुमित लांडे, लेखक गजानन म्हात्रे, सुभाष हांडे देशमुख, भालचंद्र माने तसेच सेंट ऑगस्टीन हायस्कूल मधील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक संघ नेरुळचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी सांस्कृतिक समन्वय विशेषांक शब्दालय - 2025 या दिवाळी अंकाचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सौ. अमृता दिवाण यांनी लिहिलेला Love Interrupted हा ग्रंथ डॉ.कैलास शिंदे यांना भेट देण्यात आला.
ग्रंथालयाच्या प्रवेशद्वारावरच सेंट ऑगस्टीन हायस्कूल मधल्या विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे सुंदर स्वागत केले. त्यानंतर डॉ.कैलास शिंदे यांनी फित कापून दिवाळी अंकाच्या दालनाचे उद्घाटन केले. ठाणे जिल्ह्यात मुख्यतः नवी मुंबई क्षेत्रातील वाचकांना आवश्यक ते वाचन साहित्य या वाचनालयात उपलब्ध असून ग्रंथालय ही वर्धिष्णू संस्था असल्याने ग्रंथालयासाठी नेरुळ येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर भवन येथील इमारतीतील जागा महानगरपालिकेने उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती आपल्या प्रास्तविकात जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील यांनी केली.
उपस्थितांशी संवाद साधताना डॉ.कैलास शिंदे यांनी दिवाळी अंकाच्या प्रदर्शनाचे कौतुक करुन पुस्तकाचे जीवनातील महत्त्व सखोलपणे विशद केले. ते म्हणाले की, नवीन डिजिटल युगात वाचनाचे महत्त्व खूप मोठे आहे. कारण मानवाचा सर्वांगीण विकास करावयाचा असेल तर तरुण पिढीने विविध विषयांवरील ग्रंथांचे नियमितपणे वाचन केले पाहिजे. सध्याची ही जागा ग्रंथालयास अपुरी पडते आहे, या आलेल्या सूचनेची दखल घेऊन त्यांनी सांगितले की, नेरुळ मधीलच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर भावनातील जागेची माहिती घेऊन त्याविषयी कार्यवाही करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगतानाच शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयासाठी नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत अनुदान देण्याबाबतही सकारात्मक विचार करण्यात येईल, असे त्यांनी सुचित केले. सुभाष कुलकर्णी यांनी ग्रंथालय, वाचनालय यांचे मानवी जीवनातील महत्त्व विशद करुन वाचाल तर वाचाल या म्हणीचा उल्लेख करुन युवकांनी नियमितपणे वाचन केले पाहिजे असे स्पष्ट केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अमरजा चव्हाण यांनी केले. शेवटी संजय बनसोड यांनी आभार प्रदर्शन केले.
00000

Comments
Post a Comment