जिल्हास्तर युवा महोत्सव आयोजन समितीची बैठक संपन्न
सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून जिल्हा युवा महोत्सव यशस्वी करावा -जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ
ठाणे,दि.27(जिमाका):- जिल्हास्तर युवा महोत्सव आयोजन करण्याकरिता जिल्हास्तर आयोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली. या बैठकीत सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून जिल्हा युवा महोत्सव यशस्वी करावा, जास्तीत जास्त युवक-युवतींचा सहभाग वाढेल, यासाठी प्रयत्न करावेत, असे जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ यांनी सूचित केले.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) देविदास महाजन, जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.विंदा मांजरमकर, सायली दप्तरदार, एनसीसीचे कंपनी कमांडर कॅप्टन बिपीन धुमाळे, नेहरु युवा केंद्राच्या मनिषा शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीत संचालनालयाच्या परिपत्रकानुसार समिती गठन करण्यास मान्यता प्रदान करणे, जिल्हास्तर युवा महोत्सवाचे ठिकाण व तारीख निश्चित करणे, युवा महोत्सवाच्या अंदाजपत्रक व खर्चास मान्यता देणे या विषयांबाबत सविस्तर चर्चा झाली.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ यांनी सूचित केले की, प्रतिवर्षी जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येते, जिल्हा, विभाग, राज्यस्तर स्पर्धेमधून निवडलेला चमू राष्ट्रीय युवा महोत्सवात राज्याचे प्रतिनिधीत्व करतो. युवा महोत्सवाच्या जिल्हास्तर आयोजन समितीमध्ये संचालनालयाच्या निर्देशानुसार 9 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, यामध्ये पदसिद्ध सदस्यांसह आमंत्रित प्रतिनिधींची नियुक्ती करणे आवश्यक आहे. तसेच विज्ञान व तंत्रज्ञान विषयक तज्ञ, संगीत विशारद प्रतिनिधी, नृत्य विशारद प्रतिनिधी यांची नियुक्ती करण्याबाबत चर्चा होऊन मान्यता होणे आवश्यक आहे.
ते म्हणाले की, संचालनालयामार्फत जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन दि.31 ऑक्टोबरपूर्वी करण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाकरिता अंदाजे 500 प्रेक्षक क्षमतेचा सांस्कृतिक हॉल, स्वतंत्र चेंजिंग रुम्स, कौशल्य विकास अंतर्गत स्पर्धाकरिता बाबनिहाय स्वतंत्र कक्ष, अशा सुविधा उपलब्ध आहेत. प्रस्तावित केल्यानुसार मान्यता होणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने ठिकाण व कालावधी निश्चित होणे आवश्यक आहे.
00000

Comments
Post a Comment