फुटबॉल मधील भविष्यातील हिरे घडविण्यासाठी क्रीडा विभागाचा प्रोजेक्ट “महादेवा”


महाराष्ट्रातील 13 वर्षांखालील मुलगामुलींच्या

फुटबॉल कौशल्याचा शोध घेण्यासाठी शासनाचे प्रयत्न

 

ठाणे,दि.27(जिमाका):- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली प्रोजेक्ट महादेवा ही योजना महाराष्ट्रातील 13 वर्षांखालील मुलगामुलींच्या फुटबॉल कौशल्याचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.

निवड प्रक्रिया तीन टप्प्यांत पार पडणार आहे – जिल्हास्तरावरील निवड चाचण्या, प्रादेशिक फेरी आणि अंतिम निवड फेरी. अंतिम टप्प्यात 60 मुलांची निवड सीआयडीसीओ ग्राऊंड, खारघर येथे आणि 60 मुलींची निवड डब्ल्यूआयएफए कूपरेज मैदान, मुंबई येथे केली जाईल. यापैकी प्रत्येकी 30 मुलगामुलींची निवड केली जाईल आणि त्यांना पाच वर्षांची एकात्मिक शिष्यवृत्ती दिली जाईल, ज्यामध्ये फुटबॉल प्रशिक्षणासोबत शैक्षणिक विकासाचाही समावेश असेल. निवड झालेल्या खेळाडूंना 14 डिसेंबर रोजी मुंबईत येणाऱ्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्टार लिओनेल मेस्सी यांच्या फुटबॉल क्लिनिकमध्ये सहभागी होण्याची अनोखी संधी मिळेल.

ही योजना MITRA, क्रीडा विभाग, WIFA, CIDCO आणि VSTF यांच्या संयुक्त विद्यमाने राबविली जात असून, राज्यातील फुटबॉल क्षेत्र अधिक मजबूत करण्याचा उद्देश आहे. इच्छुक खेळाडूंनी निवड चाचण्यांपूर्वी दिलेल्या गूगल फॉर्मद्वारे नोंदणी 30 ऑक्टोबर 2025 पर्यंत करणे आवश्यक आहे.

यानुषंगाने ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंची निवड चाचणी दि.01 नोव्हेंबर 2025 रोजी मुले व 02 नोव्हेंबर 2025 रोजी मुली श्री. यशवंतराव चव्हाण फुटबॉल मैदान, सेक्टर 19, नेरूळ, नवी मुंबई येथील क्रीडांगणात सकाळी 8 वाजेपासून आयोजित करण्यात येणार आहे.

या निवड चाचणीमध्ये सहभागी होण्याकरिता खेळाडूंनी आहे. https://forms.gle/1mwckj3XokoRQbb98 या गुगल लिंक द्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे.

निवड चाचणी संदर्भात खेळाडू पात्रता विषयी महत्वाच्या सूचना:-

1) सर्व खेळाडूंनी चाचणी स्थळी येण्यापूर्वी गुगल नोंदणी लिंकद्वारे (Google registration link) आपली नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे.

2) या निवड चाचणी मध्ये 1 जानेवारी 2012 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेले आणि 31 डिसेंबर 2013 रोजी किंवा त्यापूर्वी जन्मलेले खेळाडू सहभागी होवू शकतील. 

3) सर्व खेळाडूंनी त्यांचे मूळ आधार कार्ड आणि जन्म प्रमाणपत्र सोबत घेऊन येणे आवश्यक आहे. (रंगीत झेरॉक्स किंवा मोबाईलवरील सॉफ्ट कॉपी स्वीकारली जाणार नाही.)

4) खेळाडूच्या जन्म तारखेपासून एक वर्षानंतर जन्म प्रमाणपत्रावर नोंदणीची तारीख असल्यास, तो खेळाडू स्पर्धेत भाग घेण्यासाठी अपात्र ठरेल.

5) खेळाडूचा पत्ता ठाणे जिल्ह्यातीलच असावा.

6) ठाणे जिल्हास्तर निवड चाचणीत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पहिल्या 20 खेळाडूंची निवड ही विभागस्तरीय निवड चाचणीसाठी करण्यात येईल.

हा कार्यक्रम अत्यंत महत्वाचा असून, राज्यातील फुटबॉल खेळाला नवी दिशा देणारा आहे. तरी महादेवा या महत्त्वाकांक्षी योजनेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुवर्णा बारटक्के यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”