ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात उद्या 'शिवकालीन वस्तूंचे प्रदर्शन' आणि सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन

ठाणे,दि.18(जिमाका):- सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी 'शिवजयंती' निमित्त विविध भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे 'शिवकालीन वस्तूंचे प्रदर्शन' असून, याद्वारे नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील ऐतिहासिक वारसा जवळून अनुभवता येणार आहे. अश्वमेध प्रतिष्ठान आणि 'इंटॅक' (INTACH) ठाणे चॅप्टर यांच्या विशेष सौजन्याने हे प्रदर्शन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, ठाणे येथे भरवण्यात येणार आहे.

उद्या सकाळी ८:३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयापासून निघणाऱ्या भव्य पदयात्रेने या दिमाखदार सोहळ्याची सुरुवात होणार आहे. त्यानंतर सकाळी ९:३० वाजता शिवकालीन युद्धकला आणि साहसी खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली जातील. सकाळी १०:३० वाजता 'शिवकालीन वस्तूंच्या प्रदर्शनाचे' औपचारिक उद्घाटन होईल, ज्यामध्ये ऐतिहासिक शस्त्रे आणि त्या काळातील दुर्मिळ वस्तू पाहायला मिळतील.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात, सकाळी ११:०० वाजता शिवरायांच्या जाज्वल्य जीवनपटावर आधारित विविध प्रायोगिक कला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी या सर्व कार्यक्रमांना जास्तीत जास्त शिवप्रेमी आणि नागरिकांनी उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन केले आहे.

000000


Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ