‘हिंद दी चादर’ समूहगानाचा नवा जागतिक विक्रम

51 लाख विद्यार्थ्यांच्या स्वरात घुमला गुरु तेग बहादूरजींच्या बलिदानाचा इतिहास

ठाणे,23(जिमाका): “समूहगायनाच्या माध्यमातून ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या महान बलिदानाचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवून सामाजिक ऐक्य, सद्भावना आणि राष्ट्रीय एकात्मतेला बळ मिळेल,” असे प्रतिपादन ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज येथे केले.

गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी समागमानिमित्त कोकण विभागात आयोजित करण्यात आलेल्या या भव्य समूहगान उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, त्याची 'Best of India Records' या संस्थेकडून ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ म्हणून नोंद करण्यात आली आहे.

कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून आज सकाळी ९.०० वाजता विभागातील सर्व शासकीय व खाजगी शिक्षण संस्थांमध्ये एकाच वेळी हे विशेष समूहगान आयोजित करण्यात आले होते. सुप्रसिद्ध गायक सतिंदर सरताज यांनी गायलेले ‘हिंद की चादर’ हे गीत सुमारे २० हजार शाळांमधील ५१ लाख विद्यार्थी आणि १.५ लाख शिक्षक व कर्मचाऱ्यांनी एका सुरात गायले.

जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ यांनी ठाणे तलावपाळी येथील सर जॉन बाप्टिस्ट उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे स्वतः उपस्थित राहून या उपक्रमात सहभाग नोंदविला. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, ठाण्याचे शिक्षणाधिकारी देविदास पंडित महाजन, प्राचार्य पोप थॉमसन किणी, समन्वयक शफिक शेख यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.   

दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ म्हणाले की, अशा उपक्रमांमुळे इतिहासातील महान व्यक्तिमत्त्वांचा त्याग, शौर्य आणि मूल्याधिष्ठित जीवन नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचते. गुरु तेग बहादूर यांनी धर्मस्वातंत्र्याच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान हे संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी या ऐतिहासिक उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व शैक्षणिक संस्था, शिक्षक आणि प्रशासनाचे आभार मानले. तसेच, गुरु तेग बहादूर यांच्या कार्यकाळात त्यांना साथ देणाऱ्या शीख, सिकलकर, बंजारा, लाबाना, मोहयाल, सिंधी, वाल्मिकी, उदासीन आणि भगत नामदेव (वारकरी) संप्रदायातील सर्व समाजबांधवांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

येत्या २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी नवी मुंबईतील खारघर (सेक्टर २९, ओवे मैदान) येथे ३५० व्या शहिदी समागमानिमित्त भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी आणि गुरु तेग बहादूरजींच्या बलिदानाचा इतिहास जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे समूहगानाचे आयोजन करण्यात आले होते. कोकण विभागातील विविध जिल्ह्यांतील अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये उपस्थित राहून या जागतिक विक्रमात सहभाग नोंदविला. या उपक्रमामुळे सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश व्यापक स्तरावर पोहोचला आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ