कृषी पुरस्कारांसाठी ऑनलाईन प्रणालीचा शुभारंभ; अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक

ठाणे,दि.23(जिमाका):- महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत दरवर्षी शेती व पूरक क्षेत्रात उल्लेखनीय व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शेतकरी, महिला, व्यक्ती तसेच संस्थांचा विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मान करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर पुरस्कार प्रस्तावांची प्रक्रिया अधिक सुलभ, वेळबद्ध, पारदर्शक व परिणामकारक करण्यासाठी कृषी विभागाने स्वतंत्र ऑनलाईन संगणक प्रणाली विकसित केली आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे. ही प्रणाली कृषी विभागाच्या https://krishi.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ‘कृषी पुरस्कार’ या टॅबमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे.

डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यानपंडित पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), युवा शेतकरी पुरस्कार तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठीचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार हे पुरस्कार माननीय राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते प्रदान करून संबंधितांचा गौरव करण्यात येतो.

यापूर्वी विविध कृषी पुरस्कारांसाठीचे प्रस्ताव चार प्रतींमध्ये ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जात होते. प्रस्ताव तयार करण्यासाठी लागणारा खर्च, कागदपत्रांची पूर्तता व प्रशासकीय प्रक्रियेतील विलंब यामुळे अनेक इच्छुक शेतकरी अर्ज करण्यापासून वंचित राहत होते. तसेच प्रस्ताव सादरीकरण, पडताळणी व संकलन प्रक्रियेस अधिक कालावधी लागत होता.

या पार्श्वभूमीवर पुरस्कार प्रस्तावांची प्रक्रिया अधिक सुलभ, वेळबद्ध, पारदर्शक व परिणामकारक करण्यासाठी कृषी विभागाने स्वतंत्र ऑनलाईन संगणक प्रणाली विकसित केली आहे. ही प्रणाली कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर ‘कृषी पुरस्कार’ या टॅबमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे.

सदर प्रणालीद्वारे पुरस्कार प्रस्ताव सादर करणे, तपासणी, मूल्यांकन तसेच अहवाल निर्मिती ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने पार पडणार आहे. यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन पारदर्शकता वाढेल, तसेच प्रक्रियेची कार्यक्षमता व विश्वासार्हता अधिक बळकट होईल. घरबसल्या ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुविधा. चार प्रती तयार करण्याचा खर्च व वेळेची बचत. एकदाच अपलोड केलेली कागदपत्रे पुन्हा सादर करण्याची गरज नाही. अर्जाच्या स्थितीची माहिती ऑनलाईन सहज उपलब्ध. छपाई, झेरॉक्स, प्रवास व टपाल खर्चात बचत, असे फायदे शेतकऱ्यांना होतील.

कृषी आयुक्त यांनी सन 2025 पासूनच्या विविध कृषी पुरस्कारांसाठी इच्छुक शेतकरी, व्यक्ती, संस्था व गटांनी ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे. इच्छुकांनी तात्काळ अर्ज करून शासनाच्या या डिजिटल सुविधेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ