छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे "शिव शंभू गाथा" सांस्कृतिक सोहळा उत्साहात संपन्न
ठाणे,दि.18(जिमाका): भारतीय इतिहासाचे देदिप्यमान पर्व आणि महाराष्ट्राचे
आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय
आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने "शिव शंभू गाथा"
या प्रेरणादायी सांस्कृतिक कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. राम गणेश गडकरी
रंगायतन येथे संपन्न झालेल्या या सोहळ्याला अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी
उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने आणि उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) रूपाली भालके
यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवरायांच्या शौर्याचा आणि स्वराज्याच्या
संकल्पनेचा जागर करण्यात आला.
कार्यक्रमाचे कौतुक करताना अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांनी
नमूद केले की, रोहित पाटील आणि त्यांच्या संपूर्ण चमूने सादर केलेली "शिव शंभू
गाथा" ही खऱ्या अर्थाने शिवशंभूंच्या शौर्यशाली इतिहासाला उजाळा देणारी ठरली आहे.
गायक रोहित पाटील यांनी स्वतः लिहिलेली आणि गायलेली ११ गीते ही शिवभक्तीचा एक वेगळा
आविष्कार असून, त्यांच्या कलेतून महाराजांच्या कार्याची प्रेरणा जनमानसापर्यंत पोहोचत
आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने यांनी आपल्या संबोधनात स्वराज्याच्या
संकल्पनेवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, पंढरीची वारी आणि रायगडची वारी यांचा मेळ
घालत महाराजांनी शक्ती आणि भक्तीचा जो संगम घडवून आणला, त्यातूनच खऱ्या अर्थाने रयतेचे
राज्य साकारले गेले. स्वराज्याचे अस्तित्व टिकवायचे असेल, तर छत्रपतींचा इतिहास केवळ
पुस्तकात न राहता तो प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात रुजला पाहिजे. रोहित पाटील आणि वैभव
थोरवे यांच्या टीमने सादर केलेल्या या कार्यक्रमात कोकणच्या मातीचा गंध आणि स्वराज्याचा
श्वास जाणवतो. या स्वरचित गीतांच्या माध्यमातून महाराजांचा इतिहास केवळ महाराष्ट्रच
नव्हे, तर संपूर्ण भारतभर पोहोचवण्याचे मोलाचे कार्य या कलाकारांनी केले आहे, असे गौरवोद्गार
त्यांनी यावेळी काढले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन निवेदक महेश दळवी यांनी केले. त्यांनी
आपल्या ओघवत्या शैलीत बहर्जी नाईक, शिवा काशीद, प्रतापराव गुजर आणि देसाईबाई यांच्या
बलिदानाची व शौर्याची माहिती देऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाची सांगता
'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' या राज्यगीताने अत्यंत उत्साही वातावरणात
झाली.
या सोहळ्याप्रसंगी तहसिलदार सचिन चौधर, रेवण लेंभे, संदीप थोरात, उमेश
पाटील, अमोल कदम, नायब तहसिलदार दत्तात्रय बेर्डे यांच्यासह जिल्हा प्रशासनातील मान्यवर,
विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000000



Comments
Post a Comment