अंबरनाथमध्ये मातृ-बाल स्वास्थ्य कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

 





ठाणे, दि.16(जिमाका) : आराध्या फाउंडेशन व इन्व्हेन्शिया CSR(corporate social responsibility) फंडिंग यांच्या सहकार्याने तसेच आरोग्य विभाग आणि ICDS (international skill development corporation)  आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मातृ–बाल स्वास्थ्य कार्यक्रम’ अंबरनाथ तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसादात राबविण्यात आला. माता व बालकांच्या आरोग्य संवर्धनासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असून विविध आरोग्यविषयक कृती कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आल्या.

या कार्यक्रमांतर्गत मंगरुळ व खुंटवली प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रातील अतीजोखमीच्या गर्भवती माता, स्तनदा माता तसेच कमी वजनाच्या बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या. मातांमधील अ‍ॅनिमिया कमी करून निरोगी बाळजन्माला प्रोत्साहन देणे, स्तनदा मातांना बाळाच्या जन्मानंतरच्या पहिल्या सहा महिन्यांपर्यंत केवळ स्तनपानाचे महत्त्व पटवून देणे तसेच ‘कांगारू मदर केअर (KMC)’ पद्धतीद्वारे बालकांच्या वजनवाढीचे फायदे समजावून सांगण्यात आले.

अतीजोखमीच्या माता व कमी वजनाच्या बालकांसाठी बोहोनोली आणि छाया हॉस्पिटल, अंबरनाथ येथे 24, 29 व 30 डिसेंबर 2025 रोजी आरोग्य मेळावे आयोजित करण्यात आले. स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ. अरुणा बेलुरे आणि डॉ. अंकशा नाईक यांनी मातांची तपासणी केली, तर बालरोग तज्ज्ञ डॉ. स्वप्नाली पुजारी यांनी बालकांची तपासणी करून आवश्यक औषधांचे वितरण केले.

23 डिसेंबर 2025 रोजी आशा सेविकांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रशिक्षणात योग्य स्तनपान पद्धती, KMC चे फायदे तसेच ‘वात्सल्य’ कार्यक्रमाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. हे प्रशिक्षण डॉ. मिलिंद शहा आणि डॉ. खानिंद्र भुयान यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

कार्यक्रमास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना मोहिते, हेल्थ सुपरवायझर श्री. संतोष सिरोसे, अराध्या फाउंडेशनचे ब्रँड ॲम्बॅसॅडर व अभिनेते श्री. हर्षद अतकरी, ICDS चे CDPO(child development project officer) बालविकास प्रकल्प अधिकारी श्री. योगेश येंनदे, पर्यवेक्षक सौ. सुनंदा मराठे व सौ. कल्पना चव्हाणे, 'दि एज्युकेशन ऑफ सोसायटी' चे प्रतिनिधी तसेच वैद्यकीय अधिकारी, एएनएम आणि आशा सेविका उपस्थित होत्या.

अराध्या फाउंडेशन चे संचालक राजेश येलदी, अमृता येलदी, कार्यक्रम अधिकारी जयश्री पाईकराव व संस्थेच्या टीमने कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी विशेष परिश्रम घेतले.

या उपक्रमामुळे अतीजोखमीच्या माता व कमी वजनाच्या बालकांच्या आरोग्य स्थितीत सुधारणा होण्यास मदत होणार असून मातृ-बाल आरोग्याबाबत जनजागृतीसही मोठी चालना मिळाली आहे.

000000000


Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ