शासनाची साथ ठाणे जिल्हा सज्ज पॅलिएटिव्ह केअर कार्यक्रमाची उपचारांपलीकडची अंमलबजावणी करणार आता रुग्णांना वेदनेतून दिलासा, घरपोच सेवा

 



 

ठाणे,दि.16(जिमाका) : राज्यामध्ये कर्करोग, हृदयरोग, मधुमेह, मज्जासंस्थे आजार, श्वसन विकार, वृद्धापकाळाशी संबंधित आजारांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. यापैकी अनेक आजार पूर्णपणे बरे होणारे नसून, अशा रुग्णांना दीर्घकाळ उपचार व सतत काळजीची गरज भासते. यासाठी शारीरिक वेदना निवारण, मानसिक व सामाजिक आधार, कुटुंबिय समुपदेशन, घरपोच सेवा, आणि जीवनाच्या अखेरच्या टप्यात सन्मानाने जगण्याची सुविधा पुरविणे आवश्यक आहे.

‘पॅलिएटिव्ह केअर’ ही वैद्यकीय शाखा रोग बरा करण्याकरिता नसून, आयुष्यावर मर्यादा आणणारे आजार असलेल्या रुग्णांच्या जगण्याचा दर्जा सुधारण्याकरिता आहे. जी मर्यादित खर्चामध्ये रुग्णालयात तसेच समुदायामध्ये देखील घरगुती काळजी व आरोग्य केंद्राद्वारे पुरविली जाऊ शकते. राज्यात पॅलिएटिव्ह केअर (उपशामक काळजी सेवा) कार्यक्रमाची व्याप्ती वाढविणे आणि सक्षमीकरण करण्यासाठी विविध स्तरावर सेवांचा विस्तार करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे राज्यातील सामान्य नागरिकांना सुलभ व दर्जेदार पॅलिएटिव्ह केअर (उपशामक काळजी सेवा) उपलब्ध करून देण्यासाठी सर्व आरोग्य संस्थांमध्ये हा कार्यक्रम सुरू करणे आवश्यक आहे.

या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या पुढाकाराने राज्यात ‘सार्वत्रिक राज्य पॅलिएटिव्ह केअर कार्यक्रम’ सुरू करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी ठाणे डॉ. श्रीकृष्ण पांचाळ व मुख्य कार्यकारी अधिकारी ठाणे रणजीत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांच्या समन्वयातून ठाणे जिल्ह्यात या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा कर्करोग, हृदयरोग, मधुमेह, मज्जासंस्थेचे आजार, श्वसन विकार तसेच वृद्धापकाळाशी संबंधित आजारांचे प्रमाण वाढत असून अनेक रुग्णांना दीर्घकालीन उपचार व सतत काळजीची गरज भासते, अशा रुग्णांना शारीरिक वेदनानियंत्रण, मानसिक-सामाजिक आधार, कुटुंबीय समुपदेशन, घरपोच सेवा व जीवनाच्या अंतिम टप्प्यात सन्मानपूर्वक काळजी मिळावी हा पॅलिएटिव्ह केअरचा मुख्य उद्देश आहे.

शासन निर्णयानुसार, पॅलिएटिव्ह केअर सेवा केवळ अंतिम अवस्थेपुरती मर्यादित न ठेवता आजार निदान झाल्यापासून उपचारांच्या संपूर्ण कालावधीत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्हा, तालुका, प्राथमिक व समुदाय स्तरावर सेवा उभारणे, प्रशिक्षित बहुविषयक मनुष्यबळ तयार करणे, वेदनाशामक औषधांचा अखंड पुरवठा, जनजागृती, केअरगिव्हर प्रशिक्षण व घरगुती सेवांना बळकटी देणे यावर भर दिला जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, नागरी आरोग्य केंद्र आणि आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये पॅलिएटिव्ह केअर सेवा बंधनकारकपणे सुरु होणार आहेत.

ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये 10 बंड राखीव ठेवण्यात येणार असून प्रत्येक उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयामध्य 2 बेड उपशामक काळजीसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. 24 तास नर्सिंग केअर, समुपदेशन, फिजिओथेरपी, आवश्यक औषधसाठा तसेच गृहभेटीचा समावेश करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाचा सर्वात महत्त्वाचा आणि धाडसी निर्णय म्हणजे मॉर्फिनसारखी प्रभावी वेदनाशामक औषधं थेट प्राथमिक आरोग्य केंद्रांवर उपलब्ध करून देणे, प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी आता प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर ती औषधे लिहून देऊ शकणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना वेदना नियंत्रणासाठी जिल्हा रुग्णालयात धाव घ्यावी लागणार नाही. आरोग्य यंत्रणेसाठी हा मोठा मानसिक आणि प्रशासकीय बदल मानला जात आहे.

या योजनेत केवळ कर्करोगच नव्हे, तर हदय, यकृत, मूत्रपिंड व फुफ्फुस निकामी होणे, स्ट्रोक, पार्किन्सन, डिमेन्शिया, वृद्धांमधील दीर्घकालीन वेदना, वाल पॅलिएटिव्ह केअर, अपंगत्व आणि दीर्घकालीन मानसिक आजार यांचा समावेश करण्यात आला आहे. म्हणजेच ही योजना काही मोजक्या रुग्णांसाठी नसून सर्वसामान्य, दुर्लक्षित आणि वेदना शमनासाठी आहे.

शासन आपल्या नागरिकांच्या उपचारांपलीकडे जाऊन त्यांच्या सन्मानपूर्वक जगण्याची जवाबदारी स्वीकारत आहे - हीच या निर्णयामागील खरी भावना आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद ठाणे यांनी कळविले आहे.

0000000000


Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ