शासकीय तंत्रनिकेतन ठाणे येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

‘Give To Gain’ संकल्पनेतून महिला आधार केंद्रांना बळ देण्याचा निर्धार

ठाणे, दि.17(जिमाका):- स्त्री शिक्षणाच्या जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत, शासकीय तंत्रनिकेतन ठाणे येथे जागतिक महिला दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात महिला सक्षमीकरण आणि सामाजिक बांधिलकीचा जागर करण्यात आला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून ठाणे जिल्हा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती अश्विनी पाटील उपस्थित होत्या. संस्थेचे प्राचार्य डॉ. डी. आर. महाजन यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. व्यासपीठावर संस्थेचे जिमखाना उपाध्यक्ष डॉ. संजय मोतलिंग, महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा श्रीमती बी. जे. चौधरी आणि संस्थेच्या प्रबंधक श्रीमती संगीता चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाचा रीतसर प्रारंभ झाला. डॉ.संजय मोतलिंग यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडून उपस्थितांचे स्वागत केले. संस्थेच्या वतीने प्रमुख पाहुण्यांना भारतीय संविधानाचे पुस्तक व गुलाब पुष्प देवून त्यांचे स्वागत करण्यात आले.

‘Give To Gain’ उपक्रम

यावर्षीच्या महिला दिनाचे औचित्य साधून संस्थेने “Give To Gain” ही नाविन्यपूर्ण संकल्पना राबविली आहे. या उपक्रमांतर्गत संस्थेतील महिला अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थिनी एकत्रित येऊन महिला आधार केंद्रांना सशक्त बनवण्यासाठी मदतीचा हात देणार आहेत, अशी माहिती अधिव्याख्याता श्रीमती संगीता बनोरे यांनी दिली.

प्रमुख पाहुण्या श्रीमती अश्विनी पाटील यांनी आपल्या भाषणात विद्यार्थिनींना महिला सक्षमीकरणाचे महत्त्व पटवून दिले, तसेच स्पर्धा परीक्षांच्या तयारीबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात विद्यार्थिनींनी आपले कलागुण सादर केले. यामध्ये गायन, लेझीम आणि बहारदार भाषणांचा समावेश होता, ज्यामुळे कार्यक्रमात मोठी रंगत आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगणक अभियांत्रिकी विभागाच्या अधिव्याख्याता जयश्री साळुंखे यांनी केले.

या कार्यक्रमास संस्थेतील महिला प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली. विद्यार्थिनींच्या सक्रिय सहभागामुळे हा सोहळा अत्यंत संस्मरणीय ठरला.

00000

Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते दि.4 एप्रिल रोजी दूरदृश्यप्रणालीद्वारे राज्यातील 30 भूप्रमाण केंद्रांचे उद्घाटन