विशेष लेख: "मिशन शितल कवच" : वाढत्या उष्मालाटेचा मुकाबला करण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासन सज्ज

राज्यात दरवर्षी उन्हाचा पारा वाढत आहे. उष्णतेच्या लाटेमुळे केवळ अस्वस्थता येत नाही, तर ती जीवघेणीही ठरू शकते. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता, प्रशासकीय विभाग, महानगरपालिका,आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने एकत्रितपणे राबवायच्या उपाययोजनांचा हा 'ॲक्शन प्लॅन'.

१. नागरी सुविधा : सावली आणि पाणी हाच आधार

महानगरपालिका आणि नगरपालिकांनी सार्वजनिक ठिकाणी (बस स्टँड, बाजार, रिक्षा स्टँड) तात्पुरत्या शेडची व्यवस्था करावी. 'वॉटर एटीएम' किंवा पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून द्यावी. शॉपिंग मॉल्सनी केवळ ग्राहकांसाठीच नव्हे, तर सर्वसामान्यांसाठीही थंड पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. दुपारी १२ ते ४ या वेळेत शहरातील उद्याने खुली ठेवून नागरिकांना विसावा घेण्याची संधी द्यावी.

२. आरोग्य यंत्रणा : 'गोल्डन अवर'मध्ये उपचार

* स्वतंत्र वॉर्ड: प्रत्येक रुग्णालयात उष्माघाताच्या (Heat Stroke) रुग्णांसाठी वातानुकूलित किंवा थंड वॉर्ड असावेत.

* जलद प्रतिसाद टीम (RRT): उष्माघाताची लक्षणे दिसताच तात्काळ उपचार करण्यासाठी विशेष पथके तैनात असावीत.

* असुरक्षित गट: लहान मुले, वृद्ध, गरोदर महिला आणि मजुरांकडे विशेष लक्ष देण्यासाठी आशा वर्कर व अंगणवाडी सेविकांनी घरोघरी जाऊन जनजागृती करावी.

३. शिक्षण आणि कामगार : वेळापत्रकात बदल अनिवार्य

* शाळा: उन्हाची तीव्रता पाहता शाळा सकाळच्या सत्रात भराव्यात किंवा आवश्यकतेनुसार सुट्ट्या जाहीर कराव्यात. मैदानावरील खेळ दुपारी टाळावेत. मध्यान्ह भोजनात ताक किंवा ओआरएस (ORS) यांचा समावेश करावा.

* मजूर: 'मनरेगा' आणि बांधकामावरील मजुरांच्या कामाच्या वेळा बदलाव्यात. कामाच्या ठिकाणी छप्पर आणि थंड पाणी असणे मालकाची जबाबदारी असेल. मजुरांना 'सीपीआर' (CPR) चे प्राथमिक प्रशिक्षण द्यावे.

४. प्राणी आणि पर्यावरण : निसर्गाचीही काळजी

वन विभागाने वन्यप्राण्यांसाठी जंगलात पाणवठे तयार करावेत. पशुधन विभागाने जनावरांच्या गोठ्यात थंड पाण्याची आणि हिरव्या चाऱ्याची सोय करण्यासाठी पशुपालकांना मार्गदर्शन करावे.

५. पोलीस आणि वाहतूक विभाग

ट्रॅफिक सिग्नलवर कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांसाठी छत्री किंवा बूथची सोय करावी. सर्व सार्वजनिक बसमध्ये प्रथमोपचार पेटी आणि ओआरएस पाकीट उपलब्ध असावेत.

उष्मालाटेपासून बचावासाठी 'हे' नक्की करा (NPCCHH मार्गदर्शक सूचना)

काय करावे? (Do's)

* भरपूर पाणी प्या: तहान लागलेली नसली तरीही दिवसातून वारंवार पुरेसे पाणी प्यावे. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवणे हा उष्माघातापासून वाचण्याचा सर्वोत्तम उपाय आहे.

* सोबत पाणी ठेवा: प्रवासादरम्यान किंवा बाहेर पडताना पाण्याची बाटली नेहमी सोबत ठेवा.

* नैसर्गिक पेयांचे सेवन करा: आहारात लिंबू पाणी, ताक, लस्सी, फळांचा रस आणि नारळ पाणी यांसारख्या घरगुती पेयांचा समावेश करा.

* ओआरएस (ORS) वापरा: शरीरातील क्षारांचे प्रमाण कमी होऊ नये म्हणून ओआरएस द्रावणाचा वापर करा.

* पाणीदार फळे आणि भाज्या खा: टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी आणि कोशिंबीर यांसारख्या जास्त पाणी असलेल्या हंगामी फळांचे व भाज्यांचे सेवन करा.

* योग्य कपड्यांची निवड: बाहेर जाताना पातळ, सैल आणि हलक्या रंगाचे सुती कपडे वापरावेत.

* डोके आणि शरीर झाकून ठेवा: थेट सूर्यप्रकाश टाळण्यासाठी बाहेर पडताना छत्री, टोपी, टॉवेल किंवा दुपट्ट्याचा वापर करा. डोके झाकून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

* पादत्राणे वापरा: कडक उन्हात अनवाणी फिरू नका, बाहेर जाताना नेहमी बूट किंवा चपलांचा वापर करा.

* हवामानाची माहिती घ्या: रेडिओ, टीव्ही, वृत्तपत्रे किंवा भारतीय हवामान विभागाच्या (IMD) संकेतस्थळावरून उष्णतेच्या लाटेबाबतच्या सूचना आणि अपडेट्स नियमितपणे पाहत राहा.

* थंड ठिकाणी राहा: दिवसा शक्यतो हवेशीर आणि थंड ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करा. खिडक्यांना पडदे लावा आणि रात्री थंड हवा येण्यासाठी खिडक्या उघड्या ठेवा.

* कामाचे नियोजन: घराबाहेरची कष्टाची कामे शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा, जेव्हा तापमान कमी असते, तेव्हा पूर्ण करा.

काय करू नये? (Don'ts)

* भर उन्हात फिरणे टाळा: विशेषतः दुपारी १२:०० ते ३:०० या कालावधीत, जेव्हा उष्णता सर्वाधिक असते, तेव्हा घराबाहेर पडणे टाळावे.

* कठोर शारीरिक श्रम टाळा: दुपारच्या वेळी बाहेर असताना ओझे उचलणे किंवा कष्टाची शारीरिक कामे करू नका.

* विशिष्ट पेयांचे सेवन टाळा: अल्कोहोल (मद्य), चहा, कॉफी आणि मोठ्या प्रमाणात साखर असलेली कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स पिणे टाळा, कारण यामुळे शरीरातील पाणी वेगाने कमी होते.

* चुकीचा आहार टाळा: जास्त प्रथिने असलेले अन्न (उदा. मांसाहार) आणि शिळे अन्न खाणे टाळावे.

* उन्हात स्वयंपाक टाळा: घरामध्ये हवा खेळती नसल्यास अति उष्णतेच्या वेळी (दुपारी) स्वयंपाक करणे टाळा. स्वयंपाकघराचे दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवा.

* वाहनांमध्ये कोणालाही सोडू नका: उभ्या असलेल्या किंवा पार्क केलेल्या वाहनांमध्ये लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना एकटे सोडू नका. बंद गाडीतील तापमान काही मिनिटांतच जीवघेणे ठरू शकते.

* अंधाधुंद श्रम नको: जर तुम्ही थंड प्रदेशातून उष्ण ठिकाणी आला असाल, तर तुमच्या शरीराला तिथल्या तापमानाशी जुळवून घेण्यासाठी किमान एक आठवडा द्या; लगेच जास्त श्रम करू नका.

प्रशासकीय समन्वय आणि आपत्ती व्यवस्थापन..

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (DDMA) प्रत्येक तालुक्यात 'नोडल अधिकारी' नियुक्त करून दैनंदिन अहवाल घ्यावा. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने गरजूंपर्यंत छत्री आणि पादत्राणे पोहोचवावीत. समाजमाध्यमांचा वापर करून नागरिकांना हवामानाचे नियमित अपडेट्स द्यावेत.

सावध राहा, सुरक्षित राहा! उन्हाच्या झळांपासून स्वतःचा आणि इतरांचा बचाव करणे, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे (DDMA) अध्यक्ष डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संदीप माने आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ.अनिता जवंजाळ यांनी केले आहे.

 

मनोज सुमन शिवाजी सानप

जिल्हा माहिती अधिकारी,

ठाणे / रायगड

तथा

प्र.उपसंचालक,

विभागीय माहिती कार्यालय,

कोकण भवन, बेलापूर, नवी मुंबई.

00000

Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते दि.4 एप्रिल रोजी दूरदृश्यप्रणालीद्वारे राज्यातील 30 भूप्रमाण केंद्रांचे उद्घाटन