मुंबई- मीरा भाईंदरच्या वेगवान प्रगतीचा 'मेट्रो' अध्याय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 100 किमीच्या ऑपरेशनल नेटवर्कचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण!
ठाणे दि.07(जिमाका):- ‘2018 मध्ये पेरलेल्या स्वप्नाचे
आज वटवृक्षात रूपांतर झाले असून, मेट्रो 9 च्या या लोकार्पणामुळे मुंबई आणि मीरा-भाईंदरमधील
अंतर खऱ्या अर्थाने मिटले आहे,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रगत
वाहतूक व्यवस्थेचा नवा अध्याय उलगडला.
दहिसर पूर्व ते काशिगाव या 4.4 किमीच्या पहिल्या
टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिबीन कापून आणि हिरवा झेंडा
दाखवून केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांसोबत दहिसर पूर्व स्थानकाची
पाहणी केली आणि दहिसर पूर्व ते काशीगाव मेट्रोने प्रवासही केला.
या ऐतिहासिक सोहळ्याच्या वेळी उपमुख्यमंत्री तथा मुंबई महानगर प्रदेश
विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, मीरा भाईंदर
महानगरपालिकेच्या महापौर डिंपल मेहता, उपमहापौर ध्रुव किशोर पाटील, मीरा-भाईंदरचे आमदार
नरेंद्र लालचंद मेहता, बोरिवलीचे आमदार संजय उपाध्याय, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे
महानगर आयुक्त डॉ.संजय मुखर्जी, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, मीरा-भाईंदर महानगरपालिका
आयुक्त राधा विनोद शर्मा तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेट्रो 9 या प्रकल्पाबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींशी
संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वास व्यक्त केला की, हा प्रकल्प
केवळ प्रवासाचा वेळ तासांवरून 30 मिनिटांवर आणणार नाही, तर वेस्टर्न एक्सप्रेस वे वरील
वाहतूक कोंडी फोडण्यासही मैलाचा दगड ठरणार आहे. विशेष म्हणजे, या सोहळ्यामुळे मुंबईने
दिल्लीपाठोपाठ देशातील दुसरी सर्वात मोठी ऑपरेशनल मेट्रो यंत्रणा (100 किमी पेक्षा
जास्त) बनण्याचा बहुमान मिळविला आहे. नागपूर पॅटर्नप्रमाणे एकाच पिलरवर मेट्रो आणि
फ्लायओव्हर ही दुहेरी व्यवस्था असलेल्या या प्रकल्पात सौर ऊर्जा आणि 80% कॅशलेस व्यवहारांसारखी
आधुनिक वैशिष्ट्ये मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केली. 'सिम्लेस कनेक्टिव्हिटी'चे उद्दिष्ट
डोळ्यासमोर ठेवून, कुलाब्यापर्यंतचा प्रवास सुखकर करण्यासाठी दुसऱ्या टप्प्याचे 96%
काम पूर्ण झाल्याची आनंदाची बातमीही त्यांनी यावेळी दिली. एमएमआरडीए आणि कष्टकरी मजुरांचे
कौतुक करीत, मुंबईला जगातील सर्वात सुगम शहर बनविण्याच्या दिशेने हे एक आश्वासक पाऊल
असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
- उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांचा विश्वास
प्रकल्पाविषयी अधिक माहिती…
मेट्रो लाईन 9 (दहिसर पूर्व ते मीरा-भाईंदर)
* लांबी: 10.5 किमी (उन्नत)
* एकूण स्थानके: 8
* स्थानकांची नावे: दहिसर (पूर्व), पांडुरंगवाडी, मीरागांव, काशिगांव, साई बाबा
नगर, मेदमेदेतिया नगरहीद भगत सिंग उद्यान आणि नेताजी सुभाष चंद्र बोस उद्यान
फेज 1 (दहिसर ते काशिगांव):
• लांबी: 4.7 किमी
• स्थानके: 4
• स्थानकांची नावे: दहिसर (पूर्व),
पांडुरंगवाडी, मीरागांव, काशिगांव
कनेक्टिव्हिटी:
• रेड लाईन कनेक्शन: मेट्रो मार्ग-9
हा मेट्रो मार्ग-7 (दहिसर पूर्व–अंधेरी पूर्व) आणि मार्ग-7अ (अंधेरी पूर्व–छत्रपती
शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ) यांच्या माध्यमातून 'रेड लाईन'शी जोडला जातो;
यामुळे मीरा-भाईंदर आणि विमानतळ एकमेकांशी जोडले जातात.
• पश्चिम द्रुतगती महामार्ग
(WEH) लिंक आणि इंटरचेंज: लाईन-9 ही पश्चिम द्रुतगती महामार्गच्या बाजूने मेट्रो मार्ग-7
ला जोडली जाते; यामध्ये दहिसर (पूर्व ) येथे
इंटरचेंज असून, हे मेट्रो मार्गावरील एक प्रमुख केंद्र आहे.
• टप्पा -1 मार्ग: काशिगांव पर्यंत
विस्तारल्यामुळे प्रवाशांना पश्चिम द्रुतगती महामार्गवर अंधेरी (पूर्व) पर्यंत थेट
आणि सोपा मार्ग उपलब्ध होईल.
• या एकत्रित नेटवर्कमुळे प्रवाशांना
विविध मोड्समध्ये बदल न करता सहज प्रवास करता येईल.
• या योजनेचा एक प्रमुख फायदा
म्हणजे, दहिसर टोल प्लाझा येथील प्रचंड वाहतूक कोंडी कमी होईल. अधिक थेट आणि कार्यक्षम
मेट्रो जोडणीमुळे, रस्त्यांवर येणाऱ्या वाहनांची संख्या कमी होऊ शकते; परिणामी, गर्दीच्या
वेळी (peak hours) वाहतूक कोंडी कमी होऊन वाहतुकीचा प्रवाह अधिक सुरळीत होईल.
• वाहतुकीतील या सुधारणेमुळे,
मीरा-भाईंदरमधील प्रवाशांना प्रवासाचा अधिक सुखद अनुभव मिळू शकेल.काशिगांव ते इतर महत्वाच्या
ठिकाणी थेट मेट्रो कनेक्शनमुळे प्रवास वेळ कमी होईल, विद्यार्थ्यांसाठी आणि दैनंदिन
प्रवाशांसाठी अधिक सोयीस्कर ठरेल.
• टप्पा -1, मेट्रो लाईन-9 रोजच्या
प्रवाशांच्या 20-30% प्रवासाला रोडवरून मेट्रोकडे वळवेल.
• गर्दीच्या वेळी (peak
hours), यामुळे वाहतूक कोंडी 10-15 टक्क्यांनी कमी होऊ शकते; परिणामी, वाहनांची हालचाल
अधिक वेगवान होईल आणि वाहतूक ठप्प होण्याच्या घटना कमी होतील.
• ही मेट्रो मार्गिका बस, ऑटोरिक्षा
आणि इतर मेट्रो मार्गांशी अखंडपणे जोडलेली असेल; परिणामी, प्रवाशांना खाजगी वाहनांवर
अवलंबून न राहता आपल्या गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध होतील.
• हा पहिला टप्पा संपूर्ण
'MBVV(मीरा-भाईंदर-वसई-विरार)' मेट्रो कॉरिडॉरचा मार्ग प्रशस्त करतो, ज्यामुळे मीरा-भाईंदर
आणि त्याच्या लगतच्या परिसरातील कनेक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय सुधारणा होईल.
प्रवाशांसाठी सुविधा:
• लिफ्ट्स, सरकते जिने (एस्केलेटर्स),
सीसीटीव्ही पाळत, दिव्यांग प्रवाशांसाठी सुविधा, आधुनिक फलक आणि प्रकाशमान स्थानक परिसर
या बाबी सुरक्षा व सुलभता वृद्धिंगत करतात.
हरित गतिशीलता आणि उत्सर्जन घट
रस्त्यावरून रेल्वेकडे बदल: मेट्रो लाईन-9 उच्च क्षमतेची सार्वजनिक वाहतूक पुरवते,
ज्यामुळे पूर्व उपनगरांमध्ये खाजगी वाहनांचा वापर, वाहतूक कोंडी, इंधनाचा वापर आणि
वाहनांच्या एक्झॉस्ट पाईपमधून होणारे उत्सर्जन यामध्ये लक्षणीय घट होते.
कमी कार्बन फूटप्रिंट: रस्त्यावरील वाहतुकीच्या तुलनेत, इलेक्ट्रिक मेट्रोच्या
संचालनामुळे प्रति प्रवासी-किमी CO₂ आणि सूक्ष्म कणांच्या उत्सर्जनात लक्षणीय घट होते.
ऊर्जा-कार्यक्षम प्रणाली:
• रिजनरेटिव्ह ब्रेकिंग: रेल्वे
गाड्या रिजनरेटिव्ह ब्रेकिंग प्रणालीने सुसज्ज आहेत, ज्यामुळे ब्रेकिंगमधील ऊर्जा पुनर्प्राप्त
करून ट्रॅक्शन पॉवर नेटवर्कमध्ये तिचा पुनर्वापर करणे शक्य होते, परिणामी एकूण ऊर्जेचा
वापर कमी होतो.
• ऊर्जा-कार्यक्षम स्टेशन रचना:
स्टेशनची रचना ऊर्जा-कार्यक्षम प्रकाशयोजना आणि अनुकूलित विद्युत मांडणीसह केली आहे,
ज्यामुळे कार्यान्वयनासाठी लागणारी विजेची मागणी कमी होते.
• केंद्रीकृत SCADA देखरेख:
SCADA द्वारे रिअल-टाइम ऊर्जा आणि प्रणालीच्या देखरेखीमुळे कार्यक्षम वीज व्यवस्थापन
आणि दोषांचे त्वरित निदान शक्य होते, ज्यामुळे ऊर्जेचा अपव्यय कमी होतो.
प्रवासी केंद्रित शाश्वत रचना:
• सार्वत्रिक सुलभता: अडथळामुक्त
प्रवेश (लिफ्ट, रॅम्प, स्पर्शक्षम मार्ग) सार्वजनिक वाहतुकीच्या सर्वसमावेशक आणि न्याय्य
वापरास प्रोत्साहन देतो.
• आवाज आणि कंपन नियंत्रण: आधुनिक
ट्रॅकची रचना आणि वाहनांची श्रेणी आवाज आणि कंपनाची पातळी कमी करते, ज्यामुळे सभोवतालच्या
शहरी पर्यावरणाची गुणवत्ता सुधारते.
• वर्धित सुरक्षा आणि निगराणी:
सीसीटीव्ही आणि पुरेसा प्रकाश असलेली स्थानके सार्वजनिक वाहतुकीचा अधिक अवलंब करण्यास
प्रोत्साहन देतात, ज्यामुळे अप्रत्यक्षपणे शाश्वत गतिशीलतेच्या पर्यायांना समर्थन मिळते.
प्रकल्पाचे फायदे:
* प्रवाशांसाठी सुरक्षित, आरामदायक आणि सुलभ प्रवास.
* बहुविध वाहतुकीचे उत्कृष्ट एकीकरण (मल्टी मोडल इंटिग्रेशन).
* कार्बन उत्सर्जनात घट होईल.
* वाहतूक कोंडी कमी होईल.
* प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल.
0000000000
.jpeg)
.jpeg)
Comments
Post a Comment