आरआयएमसी प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ आता 20 एप्रिलपर्यंत स्वीकारले जाणार अर्ज
ठाणे, दि.17(जिमाका)
:- राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (आरआयएमसी), डेहराडून
येथील प्रवेशासाठी दि. ७ जून २०२६ रोजी आयोजित
करण्यात आलेल्या प्रवेश पात्रता परीक्षेच्या आवेदनपत्र प्रक्रियेत महत्वपूर्ण बदल
करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, या
परीक्षेसाठी अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम मुदतीत आता वाढ करण्यात आली असून, इच्छुक
उमेदवारांना दि.२० एप्रिल २०२६ पर्यंत आपले अर्ज सादर करता येणार आहेत.
यापूर्वी आवेदनपत्र स्वीकारण्याची अंतिम दि. १५
एप्रिल २०२६ अशी निश्चित करण्यात आली होती, मात्र डेहराडून येथील आरआयएमसी कमांडंट
यांनी दिलेल्या नवीन सूचनांनुसार या तारखेमध्ये सुधारणा करून ती आता २० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. या निर्णयामुळे ज्या विद्यार्थ्यांना काही
कारणास्तव मुदतीत अर्ज भरता आले नव्हते, त्यांना मोठा दिलासा मिळाला असून अधिक विद्यार्थ्यांना
या नामांकित संस्थेच्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चोथे यांनी या संदर्भात अधिकृत
जाहीर प्रकटन प्रसिद्ध केले असून, राज्यातील सर्व पात्र विद्यार्थ्यांनी या वाढीव मुदतीचा
लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. ही परीक्षा संरक्षण क्षेत्रातील करिअरसाठी अत्यंत महत्त्वाची
मानली जाते, त्यामुळे जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत ही माहिती पोहोचावी यासाठी माहिती
व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत विविध प्रसारमाध्यमांना ही बातमी प्रसिद्धीसाठी पाठवण्यात
आली आहे. परीक्षेचे स्वरूप आणि अर्जाबाबतच्या अधिक तपशीलासाठी विद्यार्थी महाराष्ट्र
राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.
0000000
Comments
Post a Comment