ठाणे ग्रामीण जिल्ह्यात 28 एप्रिलपर्यंत शस्त्रबंदी आणि जमावबंदी लागू जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आदेश
ठाणे दि.17(जिमाका): ठाणे ग्रामीण जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात आगामी सण-उत्सव, राजकीय नेत्यांचे
दौरे आणि विविध संघटनांच्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित
राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार
मनाई आदेश जारी केले आहेत. हे आदेश १७ एप्रिल
२०२६ रोजी मध्यरात्री १२.०० वाजल्यापासून ते २८ एप्रिल २०२६ रोजी रात्री २४.००
वाजेपर्यंत संपूर्ण ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रासाठी
लागू राहतील.
जिल्ह्यात सध्या विविध राजकीय पक्ष आणि संघटनांकडून आपल्या मागण्यांसाठी मोर्चे,
रॅली आणि धरणे आंदोलने केली जात आहेत. तसेच महत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यावेळी विरोधी
गटांकडून निदर्शने करण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच काळात शहापूर कार्यक्षेत्रातील
सोनाई-शितलाई देवीचा यात्रोत्सव, वज्रेश्वरी येथील योगिनीदेवीचा यात्रोत्सव, छत्रपती
शिवाजी महाराज यांचा पारंपारिक जन्मोत्सव आणि अक्षय तृतीया यांसारखे सण-उत्सव साजरे
होणार आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि
समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे सोयीचे व्हावे, या हेतूने हे कडक निर्बंध लादण्यात
आले आहेत.
या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी शस्त्रे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे किंवा
शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बाळगण्यास सक्त मनाई करण्यात
आली आहे. तसेच दगड किंवा क्षेपणास्त्रे फेकण्याची साधने गोळा करणे, स्फोटक किंवा क्षारक
पदार्थ सोबत नेणे आणि सार्वजनिक ठिकाणी घोषणाबाजी करणे, गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजवणे
यावरही बंदी असेल. याशिवाय सभ्यता व नीतिमत्तेला धक्का पोहोचवणारे किंवा सुरक्षितता
धोक्यात आणणारे कोणतेही भाषण, हावभाव, फलक किंवा चिन्हे वापरण्यास मनाई असून पाच किंवा
त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. प्रशासनाने
नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर
कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
0000000
Comments
Post a Comment