​​ महिला सक्षमीकरण जिद्द आणि कौशल्याच्या जोरावर कोपर खैराणेच्या सौ. कविता भिसे यांची आत्मनिर्भरतेकडे यशस्वी झेप!

 

 



            ठाणे,दि.14(जिमाका) : केंद्र आणि राज्य शासनाच्या 'महिला सक्षमीकरण' मोहिमेला खऱ्या अर्थाने बळ देणारे एक प्रेरणादायी उदाहरण नवी मुंबईतील कोपर खैराणे परिसरात समोर आले आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आणि कौशल्याची जोड देत सौ. कविता अनिल भिसे यांनी टेलरिंग व्यवसायातून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली असून, त्यांचा हा प्रवास आज अनेक महिलांसाठी दीपस्तंभ ठरत आहे.

            मूळची शेतीवर अवलंबून असणारी कौटुंबिक पार्श्वभूमी आणि बेताची आर्थिक परिस्थिती असलेल्या कविताजींचे शिक्षण ११ वी पर्यंत झाले होते. कुटुंबाचा भार पेलण्यासाठी आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्या रोजगाराच्या संधी शोधत होत्या. याच दरम्यान, रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून त्यांना 'महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (RSETI), ठाणे' या संस्थेची माहिती मिळाली. ही माहिती त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरेल, असे त्यांना त्यावेळी वाटलेही नव्हते. त्यांनी तातडीने या संस्थेच्या 'विमेन्स टेलर्स' या ३० दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात प्रवेश घेतला.

            जुलै २०२२ मधील या ३० दिवसांच्या कालावधीत कविताजींनी केवळ शिवणकामाचे तांत्रिक ज्ञानच आत्मसात केले नाही, तर कपड्यांचे विविध प्रकार, अचूक मोजमाप, आधुनिक डिझाईन्स आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यावसायिक व्यवस्थापन व ग्राहक सेवा कशी द्यावी, याचे सखोल मार्गदर्शन घेतले. या प्रशिक्षणामुळे त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळाला आणि त्यांचा आत्मविश्वास द्विगुणित झाला. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर, केवळ स्वप्न न पाहता त्यांनी १६ सप्टेंबर २०२३ रोजी स्वतःच्या जिद्दीवर टेलरिंग व्यवसायाचा श्रीगणेशा केला. सुरुवातीला स्वतःकडील १२,५०० रुपयांच्या अत्यल्प भांडवलातून त्यांनी आवश्यक साहित्य आणि यंत्रांची खरेदी केली.

            केवळ कौशल्य असून चालत नाही, तर त्याला मेहनतीची आणि वेळेच्या पालनाची जोड द्यावी लागते, हे कविताजींनी आपल्या कामातून सिद्ध केले. उत्तम फिनिशिंग आणि ग्राहकांच्या पसंतीस उतरतील अशा डिझाईन्समुळे अल्पावधीतच कोपर खैराणे परिसरात त्यांचा मोठा ग्राहकवर्ग तयार झाला. आज त्या या व्यवसायातून दरमहा सुमारे १०,००० रुपयांचे निश्चित उत्पन्न मिळवत असून, त्यांनी स्वतःसाठी एक सन्मानजनक रोजगार निर्माण केला आहे. त्यांच्या या यशामुळे केवळ आर्थिक स्थैर्यच लाभले नाही, तर समाजातही त्यांना एक नवी ओळख मिळाली आहे.

            सौ. कविता भिसे यांचा हा प्रवास केवळ एका व्यवसायापुरता मर्यादित नाही, तर तो महिला सक्षमीकरणाचा एक जिवंत दस्तावेज आहे. भविष्यात आपल्या या व्यवसायाचा विस्तार करून नवनवीन फॅशन डिझाईन्सवर काम करण्याचा त्यांचा मानस आहे. इतकेच नव्हे तर, ज्याप्रमाणे त्यांना प्रशिक्षणातून मार्ग मिळाला, तसाच मार्ग इतर गरजू महिलांना दाखवून त्यांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे उदात्त उद्दिष्ट त्यांनी समोर ठेवले आहे. "कौशल्य, मेहनत आणि जिद्द" हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे, हा संदेश कविताजी आपल्या कार्यातून समाजाला देत आहेत.

000000000000


Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ

तहसिलदारांच्या खुर्चीत शिपाई..! ; 36 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर तातू ठाकरेंचा अनोखा गौरव