महिला सक्षमीकरण: जिद्दीच्या जोरावर 'ती'ने घडविले प्रगतीचे लेणे; शहापूरच्या सौ. प्रतिक्षा बेहरे यांचा प्रेरणादायी प्रवास

        "इच्छा तिथे मार्ग" या उक्तीचा प्रत्यय शाहापूर तालुक्यातील काणवे (खर्डी) येथील एका जिद्दी गृहिणीने करून दिला आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या महिला सक्षमीकरण मोहिमेला खऱ्या अर्थाने बळ देत, सौ. प्रतिक्षा प्रकाश बेहरे यांनी आपल्या कौशल्याच्या आणि मेहनतीच्या जोरावर स्वतःचा 'कॉस्ट्यूम ज्वेलरी'चा व्यवसाय उभा केला असून, आज त्या ग्रामीण भागातील महिलांसाठी एक आदर्श बनल्या आहेत.

प्रतिक्षा बेहरे यांची कौटुंबिक पार्श्वभूमी तशी सामान्यच. 12 वी पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या आपल्या कुटुंबाला आधार देण्यासाठी शेती व्यवसायात गुंतल्या होत्या. मात्र, मनात काहीतरी स्वतःचे करण्याची आणि कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याची तीव्र ओढ होती. अशातच त्यांना शासनाच्या बचत गट (Self Help Group) आणि ईएपी (Employee Assistant Programme) कार्यक्रमाच्या माध्यमातून 'महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थे'बद्दल (Rural Self Employment Training Institute) माहिती मिळाली. हीच माहिती त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली.

त्यांनी ठाणे येथील महाबँक प्रशिक्षण संस्थेत 'जनरल ई़डीपी' या 13 दिवसांच्या निवासी प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घेतला. 10 जुलै ते 22 जुलै 2024 या कालावधीत मिळालेल्या या प्रशिक्षणामध्ये त्यांना केवळ व्यवसाय कसा करावा याचेच तांत्रिक ज्ञान मिळाले नाही, तर बाजारपेठेचे सर्वेक्षण, आर्थिक नियोजन आणि ग्राहकांशी संवाद साधण्याचे कौशल्यही आत्मसात करता आले. प्रशिक्षकांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे त्यांच्यातील आत्मविश्वासाची ज्योत पेटली.

        प्रशिक्षण पूर्ण होताच 4 सप्टेंबर 2024 रोजी त्यांनी 'कॉस्ट्यूम ज्वेलरी' व्यवसायाचा श्रीगणेशा केला. सुरुवातीला भांडवलाची अडचण असताना त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून कर्ज घेऊन कच्चा माल खरेदी केला. आपल्या हातातील कलाकुसरीचा वापर करून त्यांनी अत्यंत देखणी आणि आकर्षक ज्वेलरी तयार करण्यास सुरुवात केली. त्यांच्या दागिन्यांमधील वेगळेपण आणि गुणवत्ता यामुळे अल्पावधीतच खर्डी आणि परिसरातील महिलांमध्ये त्यांच्या ज्वेलरीची लोकप्रियता वाढली. आज त्या घरबसल्या दरमहा सुमारे 5 हजार रुपयांचे उत्पन्न मिळवत असून, त्यांनी स्वतःसाठी एक शाश्वत रोजगार निर्माण केला आहे.

या प्रवासामुळे प्रतिक्षा यांच्या आयुष्यात केवळ आर्थिकच नव्हे तर सामाजिक बदलही घडून आला आहे. एकेकाळी शेतात राबणारी एक सामान्य महिला आज एक 'उद्योजिका' म्हणून ओळखली जात आहे. त्यांच्या या यशामुळे कुटुंबाच्या उत्पन्नात मोलाची भर पडली असून समाजात त्यांचा मानसन्मान वाढला आहे. भविष्यात आपल्या या व्यवसायाचा अधिक विस्तार करून आधुनिक आणि ट्रेंडी डिझाइन्सची ज्वेलरी मोठ्या बाजारपेठेत पोहोचवण्याचे त्यांचे स्वप्न आहे. शासनाच्या योजना आणि स्वतःची जिद्द यांची सांगड घातली तर एक सामान्य महिला देखील यशाचे शिखर गाठू शकते, हेच सौ. प्रतिक्षा बेहरे यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ

तहसिलदारांच्या खुर्चीत शिपाई..! ; 36 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर तातू ठाकरेंचा अनोखा गौरव