महिला सक्षमीकरण कृषी क्षेत्रातील महिला सक्षमीकरणाचे उमटले पाऊल तंत्रज्ञान व्यवस्थापक वैशाली भापसे यांची यशोगाथा
आजच्या प्रगत
युगात महिला प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत असताना, कल्याण तालुक्यात
कृषी क्षेत्रात एक आश्वासक बदल घडत आहे. हा बदल घडवून आणण्यामागे 'तालुका तंत्रज्ञान
व्यवस्थापक' श्रीम. वैशाली आसराजी भापसे यांची दूरदृष्टी आणि तांत्रिक कौशल्य कारणीभूत
आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या महिला सक्षमीकरण मोहिमेला खऱ्या अर्थाने मूर्त रूप
देत, वैशालीजींनी आपल्या कृषी अभियांत्रिकीमधील उच्च शिक्षणाचा उपयोग थेट शेतकऱ्यांच्या
प्रगतीसाठी केला आहे. बी.टेक आणि एम.टेक (कृषी अभियांत्रिकी) अशा भक्कम शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे
त्यांना शेतीतील तांत्रिक आणि वैज्ञानिक पैलूंची सखोल जाण आहे. लहानपणापासून कुटुंबाचा
शेतीशी असलेला जवळचा संबंध आणि बळीराजाची आव्हाने प्रत्यक्ष अनुभवल्यामुळे, त्यांच्या
मनात शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली आणि याच प्रेरणेतून
त्यांनी शासकीय सेवेत प्रवेश करून कृषी विकासाचे ध्येय स्वीकारले.
तालुका तंत्रज्ञान
व्यवस्थापक म्हणून काम करताना वैशाली भापसे यांनी केवळ प्रशासकीय जबाबदारी पार न पाडता,
नाविन्यपूर्ण संकल्पना राबवण्यावर भर दिला आहे. 'आत्मा' (ATMA) योजनेअंतर्गत त्यांनी
तालुक्यात १३८ शेतकरी गटांची भक्कल बांधणी केली असून, या गटांना केवळ तांत्रिक मार्गदर्शनच
नाही तर संघटन कौशल्य आणि व्यवसायाभिमुख दृष्टिकोन मिळवून दिला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली
राबवल्या गेलेल्या शेतीशाळा, प्रशिक्षण कार्यक्रम आणि अभ्यास दौऱ्यांच्या माध्यमातून
१००० हून अधिक शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीचे धडे गिरवले आहेत. विशेषतः नैसर्गिक आणि सेंद्रिय
शेतीचा प्रचार करून त्यांनी पर्यावरणपूरक शेतीची एक नवी चळवळ उभी केली आहे. त्यांच्या
प्रयत्नांतून 'गोरजेश्वर' आणि 'ग्रीन डायमंड' सारख्या शेतकरी उत्पादक कंपन्यांची यशस्वी
स्थापना झाली असून, 'स्मार्ट' प्रकल्पांतर्गत शाश्वत शेती व्यवस्थापन आणि 'थेट ग्राहक
विक्री' या संकल्पना प्रत्यक्षात उतरल्या आहेत. यामुळे मध्यस्थांची साखळी मोडीत निघून
शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य भाव मिळत आहे.
नाविन्यपूर्ण
प्रयोगांची आवड असलेल्या वैशालीजींनी तालुक्यात 'सुरण' (Elephant Foot Yam) लागवडीसारखे
नवे प्रयोग यशस्वी करून शेतकऱ्यांसमोर उत्पन्नाचे एक उत्तम मॉडेल उभे केले आहे. शेतीसोबतच
शेतीपूरक उद्योगांना चालना देण्यासाठी त्यांनी 'पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया'
(PMFME) योजनेअंतर्गत टास्क फोर्समध्ये राहून केलेले कार्य अत्यंत मोलाचे आहे. मुंबई,
ठाणे आणि उपनगर क्षेत्रातील महिला बचत गट व नवउद्योजकांना प्रकल्प अहवाल तयार करणे,
बँकिंग प्रक्रिया पूर्ण करणे आणि शासनाचे अनुदान मिळवून देणे या सर्व बाबींत त्यांनी
मोलाची मदत केली. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे 100 पेक्षा अधिक अन्नप्रक्रिया
प्रकल्पांना मंजुरी मिळाली असून, स्थानिक ब्रँडिंग आणि पॅकेजिंगच्या मदतीने ग्रामीण
भागात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती झाली आहे. वैशाली भापसे यांच्या या यशस्वी प्रवासात
त्यांना प्रकल्प संचालक श्री. रामेश्वर पाचे, प्रकल्प उपसंचालक श्रीमती मनाली तांबडे
आणि त्यांच्या कुटुंबीयांचे भक्कम पाठबळ लाभले आहे. तंत्रज्ञानाची जोड आणि संवेदनशील
मनाची साथ मिळाल्यास एक महिला कृषी क्षेत्रात कशी क्रांती घडवू शकते, याचे वैशाली भापसे
या एक जिवंत उदाहरण बनल्या आहेत.
00000000000

Comments
Post a Comment