महिला सक्षमीकरण ध्येयवेड्या नेतृत्वाचा प्रशासकीय 'मास्टरस्ट्रोक' श्रीमती विजू सिरसाठ यांचा प्रेरक प्रवास

 


 


​            प्रशासकीय सेवेमध्ये केवळ पदाचा वापर करून काम करणे आणि त्याच पदाला आपल्या कर्तृत्वाने एक वेगळी उंची मिळवून देणे, यात खूप मोठा फरक असतो. हाच फरक कोकण विभागाच्या उद्योग सहसंचालक श्रीमती विजू अनुगा मुरलीधर सिरसाठ यांनी आपल्या गेल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात सिद्ध करून दाखवला आहे. उद्योग संचालनालयाच्या इतिहासात कोकण विभागाच्या पहिल्या महिला उद्योग सहसंचालक म्हणून जबाबदारी स्वीकारलेल्या विजू सिरसाठ यांनी आपल्या संवेदनशील, पारदर्शक आणि कार्यक्षम कार्यशैलीने महाराष्ट्राच्या औद्योगिक नकाशावर कोकणचा एक वेगळा ठसा उमटवला आहे. 

​            त्यांचे नेतृत्व केवळ आकडेवारीपुरते मर्यादित नसून, ते जमिनीवरील बदलांचे प्रतीक ठरले आहे. त्यांच्या 'व्हिजनरी' मार्गदर्शनाखाली कोकण विभागाने आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये १.३९ लाख कोटी रुपयांची विक्रमी निर्यात साध्य केली असून महाराष्ट्राच्या एकूण निर्यातीत एकट्या कोकणचा वाटा सुमारे २५ टक्के इतका मोठा आहे. विशेषतः रत्नागिरीच्या हापूस आंब्याला मिळालेला राष्ट्रीय स्तरावरील प्रथम क्रमांकाचा सुवर्ण पुरस्कार हा त्यांच्या प्रभावी 'ओडीओपी' (एक जिल्हा, एक उत्पादन) धोरणाच्या अंमलबजावणीचाच विजय मानला जातो. केवळ योजना आखणे नव्हे, तर त्यातून प्रत्यक्ष रोजगारनिर्मिती करणे याला त्यांनी प्राधान्य दिले. परिणामी, सुमारे २१हजार ५५७ कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करत ८७२ सामंजस्य करारांद्वारे सव्वा लाखांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात त्यांना यश आले. 

​            श्रीमती विजू सिरसाठ यांची कामगिरी ही मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात (CMEGP) सर्वाधिक ठळकपणे दिसून येते. पाचही जिल्ह्यांची भौगोलिक आव्हाने असतानाही, त्यांनी सूक्ष्म निरीक्षण आणि योग्य रणनीतीच्या जोरावर विभागात सलग तीन वर्षे १०० टक्क्यांहून अधिक उद्दिष्टपूर्तीची 'हॅटट्रिक' साध्य केली. त्यांच्या या प्रशासकीय कौशल्याची दखल राज्य स्तरावरही घेतली गेली असून, मुख्यमंत्र्यांच्या "१०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम" अंतर्गत त्यांच्या कार्यालयाला राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. एका जीर्ण झालेल्या जुन्या कार्यालयाचे त्यांनी सौर-ऊर्जेवर चालणाऱ्या आधुनिक आणि डिजिटल कार्यस्थळात केलेले रूपांतर हे त्यांच्या सकारात्मक हेतूचे आणि सुशासनाचे जिवंत उदाहरण आहे. 

​            एक यशस्वी अधिकारी असण्यासोबतच, त्या दोन मुलांचे उत्कृष्ट संगोपन करणाऱ्या एक प्रेरणादायी माता आहेत. त्यांची कार्यपद्धती ही केवळ फायलींचा निपटारा करणे नसून, उद्योजकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे, एमएसएमई क्षेत्राला बळ देणे आणि 'इग्नाइट' (IGNITE) सारख्या व्यासपीठांतून हजारो नवीन उद्योजक घडवणे ही राहिली आहे. 

​            कोकणच्या औद्योगिक क्षेत्राला 'सुपरफास्ट' गती देणारा हा 'कोकण पॅटर्न' आज संपूर्ण राज्यासाठी दिशादर्शक ठरत आहे. प्रशासनातील शिस्त, महिला सक्षमीकरणाचा खरा अर्थ आणि सामान्य उद्योजकाप्रती असलेली बांधिलकी जपत श्रीमती विजू सिरसाठ यांनी निर्माण केलेली ही इकोसिस्टिम महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीत सुवर्णअक्षरांनी कोरली जाईल, यात शंका नाही. त्यांच्या या गौरवशाली प्रवासासाठी आणि पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!

00000000000

Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ

तहसिलदारांच्या खुर्चीत शिपाई..! ; 36 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर तातू ठाकरेंचा अनोखा गौरव