शेतीच्या युरियाचा औद्योगिक कारखान्यांसाठी काळाबाजार कृषी विभागाचा पालघरमध्ये मोठा दणका
ठाणे दि.17(जिमाका):-
बोईसर आणि तारापूर औद्योगिक वसाहत परिसरात शेतीसाठी
वापरल्या जाणाऱ्या अनुदानित युरिया खताचा औद्योगिक वापरासाठी काळाबाजार होत असल्याचा
खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. कृषी विभागाने याप्रकरणी कडक पावले उचलली असून टेम्पो
मालक आणि चालकासह दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे खतांची साठेबाजी
आणि अवैध विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
तारापूर एमआयडीसी
परिसरात 25 मार्च रोजी पोलिसांनी एका संशयास्पद टेम्पोला अडवले होते. या टेम्पोची तपासणी
केली असता, त्यात औद्योगिक वापरासाठी असल्याचे भासवून भरलेली 50 किलो वजनाची एकूण 226
पोती आढळून आली. मात्र, या मालाबाबत चालकाकडे कोणतीही वैध कागदपत्रे नसल्याने पोलिसांचा
संशय बळावला. या घटनेचे गांभीर्य ओळखून कोकण विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक शिवाजी
आमले यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत तातडीने
तपास सुरू करण्यात आला.
जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक प्रदीप बारामते आणि कृषी अधिकारी संदीप संख्ये यांनी पंचांसमक्ष या खताचे नमुने गोळा
केले आणि ते तपासणीसाठी पुणे येथील खत चाचणी प्रयोगशाळेत पाठवले. प्रयोगशाळेच्या विश्लेषण
अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली. औद्योगिक पोत्यांमध्ये भरलेले हे खत प्रत्यक्षात
शेतीसाठी वापरले जाणारे 'नीम कोटेड' युरिया असल्याचे निष्पन्न झाले. शेतीकामासाठीचे
हे खत स्वस्त दरात मिळवून ते छुप्या पद्धतीने औद्योगिक क्षेत्रात अधिक नफ्याने विकण्याचा
हा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
याप्रकरणी खत नियंत्रण आदेश 1985 मधील तरतुदींचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत
कृषी विभागाने संबंधित टेम्पो मालक आणि चालकाविरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा
नोंदवला आहे. शेतीसाठी असलेल्या हक्काच्या खताचा असा काळाबाजार खपवून घेतला जाणार नाही
आणि यापुढेही अशा गैरप्रकारांवर कृषी विभागाची करडी नजर राहील, असा इशारा प्रशासनाने
दिला आहे.
0000000
Comments
Post a Comment