महिला सक्षमीकरण तंत्रज्ञानाची साथ आणि जिद्दीची भरारी कृषी अभियंता वैशाली भापसे यांनी फुंकले कल्याणच्या शेतीत परिवर्तनाचे वारे

 




 

केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या 'महिला सक्षमीकरण' मोहिमेला खऱ्या अर्थाने मूर्त रूप देण्याचे काम कल्याण तालुक्यात पाहायला मिळत आहे. या मोहिमेचा एक तेजस्वी चेहरा म्हणजे श्रीम. वैशाली आसराजी भापसे. तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (BTM) म्हणून कार्यरत असलेल्या वैशाली यांनी आपल्या तांत्रिक ज्ञानाचा आणि प्रशासकीय कौशल्याचा असा काही संगम साधला आहे की, आज कल्याण तालुक्यातील शेती ही केवळ उदरनिर्वाहाचे साधन न राहता व्यवसायाकडे झुकू लागली आहे.

            वैशाली भापसे यांची पार्श्वभूमीच मुळी कृषी क्षेत्रातील उच्च शिक्षणाची आहे. बी.टेक आणि एम.टेक (कृषी अभियांत्रिकी) सारख्या पदव्या संपादन केल्यावर, केवळ नोकरी न शोधता, आपल्या ज्ञानाचा उपयोग मातीशी नातं सांगणाऱ्या बळीराजासाठी करण्याचा त्यांनी निर्धार केला. लहानपणापासूनच शेतीशी असलेल्या निकटच्या संबंधामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांची त्यांना जाण होती. याच जाणीवेतून त्यांनी शासकीय सेवेत प्रवेश केला आणि आज त्या कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहेत.

            त्यांच्या कामाची व्याप्ती केवळ मार्गदर्शनापुरती मर्यादित राहिलेली नाही. 'आत्मा' (ATMA) योजनेच्या माध्यमातून त्यांनी तालुक्यात तब्बल १३८ शेतकरी गटांची बांधणी केली आहे. संघटन शक्तीचे महत्त्व ओळखून त्यांनी १००० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षणाद्वारे आधुनिक शेती, नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेतीकडे वळवले आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच आज शेतकरी रासायनिक शेतीकडून पर्यावरणपूरक शेतीकडे सकारात्मकतेने पाहत आहे. केवळ उत्पादन वाढवणे हा उद्देश न ठेवता, त्या उत्पादनाला हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी त्यांनी दोन शेतकरी उत्पादक कंपन्यांची (FPC) यशस्वी स्थापना केली आहे. यामध्ये 'गोरजेश्वर शेतकरी उत्पादक कंपनी' ही स्मार्ट प्रकल्पाच्या माध्यमातून शाश्वत शेतीवर भर देत आहे, तर 'ग्रीन डायमंड शेतकरी उत्पादक कंपनी' ही 'उत्पादक ते थेट ग्राहक' या संकल्पनेतून सेंद्रिय मालाची विक्री करून शेतकऱ्यांच्या खिशात दोन पैसे जास्त कसे येतील, यासाठी प्रयत्नशील आहे.

            नाविन्यपूर्ण उपक्रमांची ओढ असलेल्या वैशाली यांनी तालुक्यात 'सुरण' लागवडीसारखे नवे प्रयोग राबवून शेतकऱ्यांपुढे फायदेशीर पिकांचा नवा पर्याय खुला केला आहे. विशेषतः 'पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया' (PMFME) योजनेअंतर्गत त्यांनी केलेले काम महिला सक्षमीकरणाचे उत्तम उदाहरण ठरत आहे. मुंबई, ठाणे परिसरातील महिला बचत गट आणि उद्योजकांना अन्न प्रक्रिया उद्योगात उतरवण्यासाठी त्यांनी प्रकल्प अहवालापासून ते बँकिंग प्रक्रियेपर्यंत आणि अनुदानापासून ते ब्रँडिंगपर्यंत मोलाचे सहकार्य केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज १०० पेक्षा अधिक सूक्ष्म उद्योगांना मंजुरी मिळाली असून, ग्रामीण भागात रोजगाराची नवी दालने उघडली गेली आहेत.

            आपल्या या यशाचे श्रेय त्या आपले कुटुंबीय आणि मार्गदर्शक श्री. रामेश्वर पाचे (प्रकल्प संचालक, आत्मा) व श्रीमती मनाली तांबडे (प्रकल्प उपसंचालक, आत्मा) यांना देतात. तांत्रिक ज्ञान आणि सामाजिक कार्याची तळमळ असली की एखादी महिला प्रशासकीय व्यवस्थेत राहूनही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कायापालट कशी करू शकते, याचे आदर्श उदाहरण म्हणजे श्रीम. वैशाली भापसे आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

00000000000


Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ

तहसिलदारांच्या खुर्चीत शिपाई..! ; 36 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर तातू ठाकरेंचा अनोखा गौरव