महिला सक्षमीकरण जिद्द, प्रशिक्षण आणि यशाची क्लिक ठाण्याच्या पूजा साखरे यांचा फोटोग्राफीतील प्रेरणादायी प्रवास
ठाणे,दि.14(जिमाका) : हातामध्ये कॅमेरा घेऊन जगाकडे बघण्याची वेगळी दृष्टी आणि मनात काहीतरी करून दाखवण्याची
जिद्द असेल, तर प्रतिकूल परिस्थितीवरही मात करता येते, हे ठाण्याच्या पूजा रमेश साखरे
यांनी सिद्ध करून दाखवले आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या 'महिला सक्षमीकरण' मोहिमेच्या
पार्श्वभूमीवर, पूजा यांचा शून्यातून विश्व उभे करण्याचा हा प्रवास अत्यंत कौतुकास्पद
आणि जिल्ह्यातील इतर तरुणींसाठी दिशादर्शक ठरणारा आहे.
ठाणे येथील पाचपाखाडी, बनाचा पाडा परिसरात राहणाऱ्या पूजा यांचे शिक्षण पूर्ण
झाल्यानंतर त्यांच्यासमोर भविष्यातील करिअरचा प्रश्न होता. पदवीधर असूनही कुटुंबाची
आर्थिक परिस्थिती बेताची होती, कारण घराचा संपूर्ण गाडा रोजंदारीवर चालणाऱ्या उत्पन्नावर
अवलंबून होता. पूजा यांना फोटोग्राफीची उपजत आवड होती, मात्र केवळ आवड असून चालत नाही,
तर त्याला तांत्रिक कौशल्याची जोड असावी लागते. योग्य मार्गदर्शनाचा अभाव आणि महागड्या
उपकरणांसाठी लागणाऱ्या भांडवलाअभावी त्यांची ही आवड केवळ स्वप्न बनून राहिली होती.
मात्र, त्यांच्या या स्वप्नांना खऱ्या अर्थाने बळ मिळाले ते बँक ऑफ महाराष्ट्र
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेमुळे (RSETI). येथे त्यांनी फोटोग्राफी व व्हिडिओग्राफीचा
रीतसर प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केला. या प्रशिक्षणाने त्यांना केवळ कॅमेरा लेन्सच्या
तांत्रिक बाजूच शिकवल्या नाहीत, तर फोटो एडिटिंग, ग्राहक व्यवस्थापन आणि व्यावसायिक
शिस्त यांसारख्या उद्योजकतेच्या महत्त्वाच्या धड्यांचीही ओळख करून दिली. प्रशिक्षणाने
दिलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर पूजा यांनी व्यावसायिक क्षेत्रात पाऊल ठेवण्याचे
ठरवले.
व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवलाची गरज असताना, केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री
रोजगार निर्मिती कार्यक्रमा'ने (PMEGP) त्यांना मोठा आधार दिला. या योजनेअंतर्गत त्यांनी
बँक ऑफ महाराष्ट्रकडून ६ लाख रुपयांचे कर्ज मिळवले आणि स्वतःची १ लाख रुपयांची पुंजी
त्यात ओतून आधुनिक कॅमेरा व आवश्यक साहित्य खरेदी केले. एक काळ असा होता की जेव्हा
परिस्थितीमुळे त्या हतबल होत्या, पण आज त्याच पूजा एक यशस्वी 'फ्रीलान्स फोटोग्राफर'
म्हणून ओळखल्या जात आहेत. विविध सामाजिक कार्यक्रम, व्यावसायिक फोटोशूट आणि इव्हेंट्समध्ये
त्यांची कॅमेरा कौशल्ये आता लोकांच्या पसंतीस उतरत आहेत.
आज या व्यवसायाच्या माध्यमातून पूजा साखरे दरमहा २० ते २५ हजार रुपयांचे उत्पन्न
मिळवत आहेत. या यशामुळे केवळ त्यांचे उत्पन्नच वाढले नाही, तर त्यांच्या व्यक्तिमत्वातही
आमूलाग्र बदल झाला आहे. आर्थिक स्वावलंबनासोबतच समाजात एक सन्मानाची ओळख निर्माण झाल्याने
त्यांचा आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे. भविष्यात आपला हा व्यवसाय अधिक विस्तारून,
आधुनिक उपकरणांसह स्वतःचा एक भव्य स्टुडिओ उभारण्याचे त्यांचे स्वप्न आहे. पूजा साखरे
यांची ही यशोगाथा सांगते की, जर शासनाच्या योजनांची साथ आणि प्रशिक्षणाची जोड मिळाली,
तर प्रत्येक महिला आपल्या आवडीच्या क्षेत्रात यशाचे शिखर गाठू शकते.
000000000000

Comments
Post a Comment