जिल्ह्यात अवैध अंमली पदार्थ विक्री रोखण्यासाठी 'हॉटस्पॉट'वर नजर ठेवा -निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने
ठाणे,
दि.7 (जिमाका): जिल्ह्यातील अमली पदार्थांच्या तस्करीला आळा
घालण्यासाठी आणि व्यसनमुक्ती मोहिमेला गती देण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. जिल्हयातील
अंमली पदार्थांचे 'हॉटस्पॉट' शोधून त्याठिकाणी कडक नजर ठेवा, तसेच अनोंदणीकृत
व्यसनमुक्ती केंद्रांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सहकार्य करा, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने
यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात डॉ. संदीप माने यांच्या
अध्यक्षतेखाली 22 वी जिल्हास्तरीय नार्को
को-ऑर्डिनेशन सेंटर समितीची (NCORD) बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत
होते.
या बैठकीस औद्योगिक सुरक्षा उपसंचालक नितीन गजपुरे,
सहायक संचालक वंदना शिंदे, मो. अ. कुरेशी, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोषी
शिंदे, नायब तहसिलदार चंद्रकांत राजपूत, जिल्हा समन्वयक (शिक्षण प्राथमिक) अनिल
कुऱ्हाडे, मीरा-भाईंदर शिक्षण विभागाचे विशाल हिरे, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक
आयुक्त नि. पा. आहेर, मनोविकृतीचिकित्सक डॉ. विजय तेली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
जनार्दन सोनवणे, पोलीस निरीक्षक निखिल चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक तुषार माने,
सहायक पोलीस निरीक्षक दिपक पाटील व इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी यांनी विविध
विभागांमार्फत मार्च-2026 अखेरपर्यंत अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत करण्यात आलेल्या
कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेतला. यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यातील संशयास्पद
कंपन्या, गोदामे, फार्म हाऊस आणि बंद पडलेले कारखाने यांची नियमित तपासणी करण्याचे
निर्देश देण्यात आले. जिल्ह्यामध्ये सध्या किती अधिकृत व्यसनमुक्ती केंद्रे
कार्यरत आहेत आणि त्यापैकी किती केंद्रांची तपासणी झाली आहे, याचा अहवाल त्यांनी
घेतला. जे केंद्र चांगले काम करत आहेत परंतु त्यांची नोंदणी झालेली नाही, अशा
केंद्रांना नोंदणी प्रक्रियेत तांत्रिक सहकार्य करून त्यांना अधिकृत करण्याचे
आवाहन डॉ. माने यांनी केले. अमली पदार्थांची विक्री किंवा सेवन होणाऱ्या संभाव्य
ठिकाणांची (हॉटस्पॉट्स) माहिती घेऊन तेथे गस्त वाढवण्याच्या सूचना पोलीस विभागाला
देण्यात आल्या.
शासकीय रुग्णालये आणि स्थानिक प्रशासनाने समन्वय
राखून जिल्हा अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही यावेळी
करण्यात आले.
00000
.jpeg)
Comments
Post a Comment