पालघर-ठाणे जिल्ह्यातील मत्स्यशेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी खेकडा पालन प्रात्यक्षिक प्रकल्पासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 


ठाणे दि.17(जिमाका) :- महाराष्ट्र शासनाचा मत्स्यव्यवसाय विभाग आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद – केंद्रीय निमखारे जलजीव संवर्धन संस्था Indian Council of Agricultural Research – Central Institute of Brackishwater Aquaculture (ICAR-CIBA), नवसारी (गुजरात) यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर व ठाणे जिल्ह्यातील मत्स्यशेतकऱ्यांसाठी एक नाविन्यपूर्ण योजना जाहीर करण्यात आली आहे. प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत (PMMSY) सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी "मत्स्य शेततलावात पिंजरा पद्धतीने खेकडा पालन" (Mud Crab Box Culture) हा विशेष प्रात्यक्षिक प्रकल्प राबविला जाणार आहे. या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी दोन्ही जिल्ह्यातील एकूण ५ प्रगतशील मत्स्यशेतकऱ्यांची निवड केली जाणार असून, सर्वात विशेष बाब म्हणजे निवड झालेल्या लाभार्थ्यांना या प्रकल्पासाठी १०० टक्के अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. 

या प्रकल्पाचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असलेल्या अर्जदारांकडे स्वतःच्या नावावर ७/१२ उतारा असणे आवश्यक असून त्यांना मत्स्यपालन क्षेत्रातील अनुभव असणे गरजेचे आहे. तसेच संबंधित शेततळ्यावर अखंडित वीजपुरवठा, रस्त्याची सुलभ सुविधा आणि निमखाऱ्या पाण्याची उपलब्धता असणे बंधनकारक करण्यात आले आहे. निवड झालेल्या लाभार्थ्यांना नवसारी येथील ICAR-CIBA संस्थेमध्ये तांत्रिक प्रशिक्षणासाठी उपस्थित राहावे लागेल, जेणेकरून त्यांना या आधुनिक तंत्रज्ञानाची सखोल माहिती घेता येईल. 

इच्छुक मत्स्यशेतकऱ्यांनी आपला अर्ज विहित नमुन्यात भरून त्यासोबत पॅन कार्ड, बँक पासबुकची छायाप्रत, ७/१२ उतारा, नोंदणी प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रांसह दि. ३० एप्रिल २०२६ पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. हे अर्ज सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालय, ठाणे/पालघर किंवा ICAR-CIBA, नवसारी येथे कार्यालयीन वेळेत जमा करता येतील. विहित मुदतीनंतर येणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी इच्छुक शेतकरी पालघर येथील प्रशासकीय इमारत-अ मधील कक्ष क्र. २१० येथे किंवा दूरध्वनी क्रमांक ०२५२५-२५२२१५ वर संपर्क साधू शकतात, तसेच नवसारी येथील केंद्रासाठी ७९७७०७८५०९ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क उपलब्ध आहे.

0000000


Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ

तहसिलदारांच्या खुर्चीत शिपाई..! ; 36 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर तातू ठाकरेंचा अनोखा गौरव