कल्याण तालुक्यातील म्हारळ येथे 'महाराजस्व अभियान' संपन्न शेकडो लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ
ठाणे,दि.17(जिमाका): राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत,
दि.17 एप्रिल 2026 रोजी कल्याण तालुक्यातील म्हाराळ मंडळासाठी 'श्री छत्रपती शिवाजी
महाराज महाराजस्व अभियान: समाधान शिबिर टप्पा 1' चे आयोजन गोवली येथील जीवनदीप महाविद्यालय
परिसरात उत्साहात करण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून 'शासन आपल्या दारी' ही संकल्पना
प्रत्यक्षात उतरवीत, तालुक्यातील शेकडो ग्रामीण नागरिकांना विविध विभागांच्या योजनांचा
लाभ एकाच छताखाली मिळवून देण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री.किसन
कथोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना त्यांनी "प्रशासनाने जनतेच्या दारापर्यंत येऊन
त्यांचे प्रश्न सोडविणे, हाच या अभियानाचा मुख्य उद्देश आहे," असे प्रतिपादन केले.
या शिबिरासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन)
श्री.सर्जेराव म्हस्के पाटील यांनी निरीक्षक म्हणून उपस्थित राहून कामकाजाचा आढावा
घेतला.
या समाधान शिबिरात शासनाच्या विविध विभागांनी आपले स्टॉल्स लावले
होते, ज्यामध्ये प्रामुख्याने महसूल विभाग: विविध प्रकारचे दाखले आणि जमिनीशी संबंधित
कागदपत्रे, पंचायत समिती: ग्रामीण विकास आणि वैयक्तिक लाभाच्या योजना, कामगार विभाग:
कामगार नोंदणी व कल्याणकारी योजना, पुरवठा विभाग:नवीन रेशन कार्ड व शिधापत्रिका दुरुस्ती,
भूमी अभिलेख व कृषी विभाग: सातबारा उतारा व शेतीविषयक अवजारे/अनुदान, संजय गांधी निराधार
योजना व ग्रामीण पोस्ट विभाग: सामाजिक सुरक्षा पेन्शन आणि टपाल सेवा, या विभागांचा
समावेश होता.
म्हारळ-गोवली परिसरातील तसेच कल्याण ग्रामीण भागातील अनेक गरजू लाभार्थ्यांना
यावेळी प्रत्यक्ष लाभ संच आणि प्रमाणपत्रांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
तातडीने कामे झाल्याने उपस्थित नागरिकांनी आणि लाभार्थ्यांनी प्रशासनाने आयोजित केलेल्या
या शिबिराबद्दल समाधान व्यक्त केले, प्रशासनाचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या शेवटी तहसिलदार विकास गारुडकर यांनी या अभियानाच्या
यशाबद्दल माहिती दिली. तसेच त्यांनी ज्या नागरिकांना या शिबिराचा लाभ घेता आला नाही,
त्यांच्यासाठी तालुक्यात दि.८ मे २०२६ रोजी टिटवाळा येथे आणि दि.१५ मे २०२६ रोजी खडवली येथेही शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. कल्याण तालुक्यातील जास्तीत
जास्त नागरिकांनी या संधीचा फायदा घ्यावा आणि आपल्या प्रलंबित कामांसाठी संबंधित कागदपत्रांसह
उपस्थित राहावे, असे आवाहन महसूल प्रशासनाच्या वतीने केले आहे.
0000000
.jpeg)
Comments
Post a Comment