भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले 'रजत पदक' भारताचे प्रतिनिधित्व करण्याची आणि ऑलिम्पिकमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्याची इच्छा -साईशा पवार
ठाणे,दि.23(जिमाका):- ठाण्याची उदयोन्मुख क्रीडापटू साईशा विशाल पवार (वय 15) हिने राष्ट्रीय स्तरावर नेत्रदीपक कामगिरी करत ठाणे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. नुकत्याच ओडिशातील भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियममध्ये पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये सायेशाने अडथळा शर्यतीत (Hurdles) रजत पदक पटकाविले आहे.
साईशा ट्रायथलॉन, पेंटाथलॉन आणि हर्डल्स या क्रीडा प्रकारांत प्रावीण्य मिळवत आहे. तिने आतापर्यंत चार वेळा राष्ट्रीय स्तरावर सहभाग घेतला आहे. या राष्ट्रीय पदकापूर्वी, साईशाने जिल्हा आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये पेंटाथलॉन आणि हर्डल्स शर्यतीत सुवर्णपदके जिंकून आपली प्रतिभा सिद्ध केली आहे.
याविषयी आपल्या भावना व्यक्त करताना साईशा म्हणाली की, या यशामागे माझे प्रशिक्षक दर्शन देवरुखकर आणि सदाशिव पांडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. प्रशिक्षकांच्या अचूक मार्गदर्शनामुळेच मला हे यश मिळविता आले. या प्रवासात माझ्या कुटुंबाचाही मोठा पाठिंबा आहे. माझे आई-वडील आणि आजी-आजोबा यांच्यासह माझी 90 वर्षांची पणजी सरला पत्रुटकर ही प्रत्येक यशानंतर माझी पाठ थोपटून प्रोत्साहन देतात तेव्हा कुटुंबाचा हा भक्कम आधार माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरतो.
भविष्यातील ध्येयाबद्दल बोलताना साईशा म्हणाली, भविष्यातही मी अशीच मेहनत करीत राहीन आणि भारताचे प्रतिनिधित्व करेन. ऑलिम्पिकमध्ये देशाचा अभिमान वाढेल, अशी कामगिरी करण्याचे माझे स्वप्न आहे.
साईशा पवारच्या या कामगिरीबद्दल तिचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे आणि तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.
00000
Comments
Post a Comment