आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट करणार विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या नावाने 'शिष्यवृत्ती' जाहीर आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी ठाणे जिल्हा कारागृह प्रांगणात वाहिली आदरांजली
ठाणे, दि. 02 (जिमाका) : आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे आणि त्यांच्या परिवाराचा गौरवशाली इतिहास आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून १०० टक्के प्रकाशित केला जाईल, तसेच हा प्रेरणादायी इतिहास शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करून नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी आज येथे केले. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या १८७ व्या स्मृती दिनानिमित्त ठाणे जिल्हा कारागृह प्रांगणात आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी बोलताना मंत्री डॉ. उईके म्हणाले की, राघोजी भांगरे यांनी समाजासाठी आणि देशहितासाठी दिलेले बलिदान विसरता येणारे नाही. विद्यार्थ्यांमध्ये क्रांतिकारकांच्या विचारांचा प्रसार व्हावा, यासाठी शासनाने 'राघोजी भांगरे शिष्यवृत्ती' सुरू केली असून, प्रकल्प, विभाग आणि राज्य स्तरावर प्राविण्य मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती प...