कल्याण वाहतूक विभागातर्फे बकरी ईद निमित्त वाहतुकीत मोठे बदल ​

 



ठाणे दि.26(जिमाका) :- कल्याण शहरातील दुर्गाडी इदगाह येथे बकरी ईद निमित्त आयोजित सार्वजनिक नमाज पठण आणि त्याच वेळी दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गामाता मंदिरात होणारा शिवसेना पक्षाचा घंटानाद कार्यक्रम लक्षात घेता कल्याण वाहतूक उपविभागाच्या हद्दीत वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. हा सण चंद्रदर्शनानुसार दिनांक २७ मे २०२६ किंवा २८ मे २०२६ रोजी साजरा केला जाण्याची शक्यता आहे. या दोन्ही कार्यक्रमांच्या वेळी होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ठाणे शहराचे वाहतूक पोलीस उपआयुक्त पंकज शिरसाट यांनी मोटार वाहन कायदा कलम ११५ आणि ११६ (१) (अ) (ब) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ही अधिसूचना जारी केली आहे. सदर वाहतूक नियंत्रण आदेश हे दोन्ही संभाव्य दिवशी म्हणजेच दिनांक २७ मे किंवा २८ मे २०२६ रोजीच्या मध्यरात्री ००:०० वाजल्यापासून ते बकरी ईदचा नमाज पठणाचा कार्यक्रम संपेपर्यंत लागू राहतील.

            या अधिसूचनेनुसार, कल्याण शहरातील लालचौकीकडून भिवंडीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना लालचौकी येथे प्रवेश बंद करण्यात आला असून ही वाहने लालचौकी येथून उजवे वळण घेऊन आधारवाडी चौक आणि वाडेघर सर्कल मार्गे इच्छित स्थळी जाऊ शकतील. तसेच भिवंडीकडून कल्याण शहरातील आग्रा रोड आणि गोविंदवाडी बायपास मार्गे कल्याणकडे येणाऱ्या सर्व वाहनांना दुर्गामाता चौक येथे प्रवेश बंदी असेल, या वाहनांना दुर्गामाता चौकातून डावे वळण घेऊन वाडेघर सर्कल आणि आधारवाडी चौक मार्गे जावे लागेल. कल्याण पूर्व बाजूकडून म्हणजेच कोळसेवाडीकडून गोविंदवाडी बायपास मार्गे दुर्गामाता चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना पत्रीपूल येथेच रोखण्यात येणार असून, ही वाहने पत्रीपूल, गुरुदेव हॉटेल, शिवाजी चौक, सहजानंद चौक मार्गे लालचौकी येथे जाऊन तेथून उजवे वळण घेऊन आधारवाडी चौकमार्गे मार्गस्थ होतील. यासोबतच, दुर्गाडी चौक ते गोविंदवाडी बायपास-पत्रीपूल मार्ग आणि दुर्गाडी चौक ते शिवाजी चौक-पत्रीपूल मार्गावर धावणाऱ्या सर्व प्रकारच्या कंटेनर, ट्रेलर, मल्टीएक्सेल आणि जड-अवजड वाहनांसह सर्व सरकारी व खाजगी बसेसना बकरी ईदच्या दिवशी दिवस-रात्र सर्व वेळेत पूर्णपणे प्रवेश बंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, हा आदेश फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, पोलीस वाहने आणि इतर अत्यावश्यक सेवांमधील वाहनांना लागू होणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

000000000


Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ

“पत्रकारितेची पाठशाळा - बातमी मागची गोष्ट” कार्यशाळा ठाण्यात उत्साहात संपन्न