बकरी ईदनिमित्त अंबरनाथ आणि बदलापूर शहरांमधील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी ठाणे शहर वाहतूक विभागाकडून विशेष अधिसूचना जारी

 



            ठाणे,दि.26(जिमाका) :- आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ आणि बदलापूर शहरांमधील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी ठाणे शहर वाहतूक विभागाकडून विशेष अधिसूचना जारी करण्यात आली आहे. चंद्र दर्शनानुसार २७ मे २०२६ रोजी (एक दिवस मागे किंवा पुढे) सकाळी ०६:०० ते सकाळी १०:०० वाजेपर्यंत हे वाहतूक बदल लागू राहतील. ईदच्या दिवशी अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील दर्गे व मशिदींमध्ये नमाज पठण करण्यासाठी मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने एकत्र येतात, ज्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असते. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त पंकज शिरसाट यांनी मोटार वाहन कायद्यातील अधिकारांचा वापर करून हे तात्पुरते बदल केले आहेत. 

            या अधिसूचनेनुसार, अंबरनाथ रेल्वे स्टेशनकडून कोहोजगाव मार्गे चिंचपाडा येथे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना कोहोजगाव नाका येथे पूर्णपणे प्रवेश बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहनांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली असून, वाहनचालक कोहोजगाव नाक्यावरून सरळ वुलन चाळ, मक्का मस्जिद मार्गे दीपक नगर येथे डाव्या बाजूला वळतील आणि पुढे दुर्गा काली मंदिर मार्गे चिंचपाडा चौकातून आपल्या इच्छित स्थळी जाऊ शकतील. 

            दुसऱ्या बाजूने म्हणजेच चिंचपाडा येथून कोहोजगाव मार्गे अंबरनाथ शहरामध्ये येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना चिंचपाडा चौक येथे प्रवेश बंदी लागू असेल. या वाहनांना चिंचपाडा चौकातून डाव्या बाजूने वळून दुर्गा काली मंदिर मार्गे पुढे उजव्या बाजूला वळण घ्यावे लागेल; तिथून दीपक नगर ते गावदेवी चौक मार्गे इच्छित स्थळी जाता येईल. तसेच वाहनचालकांसाठी दुसरा पर्याय म्हणून दीपक नगर येथून मक्का मस्जिद समोरून वुलन चाळ आणि कोहोजगाव नाका मार्गे देखील पुढे जाण्याची मुभा देण्यात आली आहे. 

            दरम्यान, हे वाहतूक निर्बंध अत्यावश्यक सेवांसाठी शिथिल ठेवण्यात आले आहेत. पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडोअर आणि ऑक्सिजन गॅस वाहने यांसारख्या सर्वच अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या प्रवेश बंदीतून वगळण्यात आले असून त्यांची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू राहील, असे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

0000000000


Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ

“पत्रकारितेची पाठशाळा - बातमी मागची गोष्ट” कार्यशाळा ठाण्यात उत्साहात संपन्न