पीएम किसान सन्मान निधी लाभाथ्यांनी अॅग्रिस्टॅक नोंदणी तातडीने करून घेण्याबाबत
ठाणे दि.27(जिमाका) :- केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध शेतीविषयक योजनांचा थेट लाभ मिळण्यासाठी
अॅग्रिस्टॅक (AgriStack) अंतर्गत फार्मर आयडी तयार करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
केंद्राच्या अॅग्रिस्टॅक योजनेंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला स्वतंत्र डिजीटल ओळख देण्याची
प्रक्रिया सुरू आहे. कृषी योजनांमध्ये पारदर्शकता आणणे, पात्र लाभार्थीची अचूक
नोंद ठेवणे व अनुदान थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
ठाणे
जिल्ह्यातील सर्व पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना
कळविण्यात येते की, केंद्र शासनाच्या सूचनेनुसार योजनेचा लाभ घेण्यासाठी अॅग्रिस्टॅक
(AgriStack) अंतर्गत फार्मर आयडी नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
अॅग्रिस्टॅक म्हणजे
काय?
अॅग्रिस्टॅक
हा शेतकऱ्यांचा डिजिटल डेटाबेस आहे. यामध्ये शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती, जमिनीचा
तपशील व पिकांची नोंद एकाच ठिकाणी केली जाते. कृषी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या
सर्व कृषी योजनांचा लाभ याच फार्मर आयडीद्वारे दिला जाणार आहे.
अॅग्रिस्टॅक योजनेचे
फायदे :-
अॅग्रिस्टॅक
नोंदणीमुळे अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असून, ई-पीक
पहाणी, पिक विमा, नैसर्गीक आपत्ती नुकसान भरपाई प्रक्रिया अधिक वेगाने होणार आहे.
तसेच बँकांना आवश्यक माहिती तात्काळ उपलब्ध होत असल्याने पिक कर्ज मंजूरीची
प्रक्रिया सुलभ होणार आहे. हवामान अंदाज व खतांच्या शिफारशींबाबतही मार्गदर्शन
मिळणे सोपे होणार आहे. फार्मर आयडीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत जमिनीनुसार
व पिकांच्या गरजेनुसार खत उपलब्ध होणार असून यामुळे खतांचा होणारा काळा बाजार,
साठेबाजी व वनावट नोंदींना पुर्णपणे आळा बसणार आहे.
नोंदणी न केल्यास काय होईल?
1. ज्या
पीएम किसान लाभार्थ्यांची अॅग्रिस्टँक नोंदणी पूर्ण होणार नाही, त्यांचे पीएम
किसान योजनेचे पुढील हप्ते थांबवले जातील.
2. पीक
विमा, कृषि विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या इतर योजनांचे अनुदान, KCC कर्ज या
सारख्या योजनांचा लाभही मिळणार नाही.
नोंदणी कुठे व कशी करावी?
1. आपल्या
गावातील CSC केंद्र, सेतू सुविधा केंद्र, यांच्याकडे जाऊन नोंदणी करावी.
2. लागणारी
कागदपत्रे :- आधार कार्ड, ७/१२ उतारा,
८/अ उतारा, बँक पासबुक, आधार लिंक मोबाईल नंबर.
तरी ठाणे
जिल्ह्यातील ज्या खातेदारांनी अद्याप अॅग्रीस्टॅक अंतर्गत नोंदणी पूर्ण केली नाही
अशा खातेदारांनी तातडीने जवळच्या सर्व पीएम किसान लाभार्थी शेतकऱ्यांनी CSC
केंद्र, सेतू सुविधा केंद्र, यांच्याकडे जाऊन नोंदणी करावी तसेच अधिक माहितीसाठी
संबंधीत सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक
कृषी अधिकारी ठाणे रामेश्वर पाचे यांनी केले आहे.
0000000000
Comments
Post a Comment