भिवंडीत बकरी ईदनिमित्त वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल जाणून घ्या बंद रस्ते आणि पर्यायी मार्ग
ठाणे, दि.26 (जिमाका)
:- भिवंडी वाहतूक उपविभागाच्या हद्दीत २७ मे २०२६ रोजी बकरी ईदचा सण चंद्रदर्शनानुसार
एक दिवस मागे किंवा पुढे साजरा केला जाणार आहे. या दिवशी मुस्लिम बांधव पहाटेपासूनच
नमाज पठणासाठी वेगवेगळ्या मशिदींमध्ये मोठ्या संख्येने एकत्र येत असतात. या पार्श्वभूमीवर
परिसरात कोणतीही वाहतूक कोंडी होऊ नये आणि वाहतूक व्यवस्था अत्यंत सुटसुटीत व सुरक्षित
राहावी यासाठी ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त पंकज शिरसाठ यांनी मोटार वाहन
कायद्यानुसार विशेष वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी केली आहे. हे बदल २७ मे २०२६ रोजी सकाळी ६:०० वाजल्यापासून ते सकाळी १०:०० वाजेपर्यंत लागू राहतील. या काळात पोलीस वाहने, अग्निशामक दल, रुग्णवाहिका
आणि इतर सर्व प्रकारच्या अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या नियमांमधून पूर्णपणे वगळण्यात
आले आहे.
या अधिसूचनेनुसार, मुंबई, ठाणे आणि मानकोलीकडून जुन्या ठाणे-आग्रा रोडने भिवंडी
शहराकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड व अवजड वाहनांना अंजुरफाटा येथे पूर्णपणे प्रवेश
बंद करण्यात आला आहे. ही वाहने वसई रोडने कारीवली जकातनाका आणि विटभट्टी मार्गे आपल्या
इच्छित स्थळाकडे पुढे प्रवास करू शकतील. तसेच मुंबई व ठाण्याकडून अंजुरफाट्यामार्गे
भिवंडी शहरात येणाऱ्या सर्व एसटी बसेस, टीएमटी बसेस आणि हलक्या वाहनांना नारपोली पोलीस
स्टेशन येथे प्रवेश नाकारण्यात आला आहे. या प्रवासी बसेस नारपोली पोलीस स्टेशन येथेच
प्रवाशांना उतरवून तेथूनच नवीन प्रवासी घेऊन परत फिरतील, तर हलकी वाहने देवजीनगर किंवा
साईनाथ सोसायटी, कामतघर रोडचा वापर करून पुढे जातील.
रांजनोली नाक्याकडून भिवंडी शहरात येणाऱ्या कार, रिक्षा, दुचाकीसह सर्व प्रकारच्या
जड, मध्यम व हलक्या वाहनांना तसेच एसटी, केडीएमटी आणि टीएमटी बसेसना रांजनोली नाका
येथे प्रवेश बंद असेल. यातील जड, मध्यम व हलकी वाहने रांजनोली नाक्यावरून वळसा घेऊन
मुंबई-नाशिक बायपास हायवेवरील मानकोली नाक्यावरून अंजुरफाटा किंवा वसई रोडने अथवा ओवळी
खिंड, ओवळी गाव, ताडाळी जकातनाका व पाईपलाईन रोडने पुढे जातील. बसेस रांजनोली नाका
येथेच प्रवाशांची चढ-उतार करून तेथूनच परत फिरतील. वाडा रोडने नदीनाका मार्गे भिवंडीत
येणाऱ्या जड व अवजड वाहनांना पारोळफाटा म्हणजेच नदीनाका येथे प्रवेश बंदी करण्यात आली
असून, ही वाहने अंबाडी नाका येथून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८ ने अथवा बृहन्मुंबई
महानगरपालिका पाईपलाईन मार्गाने पुढे मार्गस्थ होतील.
याच मार्गावरील हलक्या वाहनांना मेट्रो हॉटेल येथे प्रवेश बंद करण्यात आला असून,
ही वाहने मेट्रो हॉटेल येथून उजवीकडे वळून संगमपाडा रोड व अजयनगर मार्गे इच्छित स्थळी
जाऊ शकतील. वडपा चेकपोस्ट मार्गे भिवंडी शहराकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना
आणि एसटी बसेसना धामणगाव जांबोळी पाईपलाईन नाका व चाविंद्रा नाका येथे प्रवेश बंदी
असेल. ही वाहने धामणगाव पाईपलाईन येथे उजवीकडे वळून पाईपलाईन मार्गे वाड्याकडे जातील,
तर एसटी बसेस चाविंद्रा जकातनाका येथेच प्रवाशांना सोडून तेथूनच परत जातील. याशिवाय,
छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून वंजारपाटी नाका मार्गे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना
शिवाजी महाराज चौकात प्रवेश बंद करण्यात आला असून, सदर वाहने अजयनगर, संगमपाडा मेट्रो
हॉटेल येथून डावीकडे वळून वंजारपाटी ब्रिजवरून पुढे जातील. नागरिक आणि वाहनधारकांनी
संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी या सुधारित वाहतूक मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक
पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.
0000000000
Comments
Post a Comment