हिंद दी चादर: एकात्मतेची रेशमी वीण अन् संस्कृतीची ऊब..!

 





नमस्कार..! पु.ल. देशपांडे एका ठिकाणी म्हणतात, "माणसं जोडणं हाच खरा धर्म आणि ती टिकवणं हीच खरी संस्कृती." आपण जेव्हा 'हिंद दी चादर' म्हणतो, तेव्हा ती केवळ एक कापडाची उपमा नसते, तर ती कोट्यवधी हृदयांच्या स्पंदनांनी विणलेली एक संरक्षक कवच असते. कडाक्याच्या थंडीत जशी एखादी मायेची शाल आपल्याला ऊब देते, तशीच ही भारतीय संस्कृती विविधतेच्या वादळात आपल्याला आजही एकत्र धरून आहे.

            माझे मित्र ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप साहेब यांच्याशी चर्चा करताना एक विषय निघाला, ते म्हणाले, "कट्टी सर, आपली संस्कृती म्हणजे केवळ सण-उत्सव नाहीत, तर ते जगण्याचं एक शास्त्र आहे. जेव्हा आपण वेशभूषा, खाद्यपदार्थ किंवा व्यापार बघतो, तेव्हा त्यात आपल्याला एकमेकांबद्दलची आदरभावना दिसते." हीच भावना घेऊन आपण या चादरीचे विविध पदर उलगडणार आहोत.

1. वेशभूषा: अस्मितेचे रंग..

            आपल्या वेशभूषेवरून आपली ओळख ठरते, पण भारतीय वेशभूषा ही 'अनेकता में एकता'चे उत्तम उदाहरण आहे. पंजाबातील शीख बांधवांची डौलदार दस्तार (पगडी), काश्मीरमधील पंडितांचा उबदार फेरण, महाराष्ट्रातील वारकऱ्यांचे पांढरेशुभ्र धोतर आणि उपरणं, आणि सिंधी बांधवांची वैशिष्ट्यपूर्ण टोपीहे केवळ पेहराव नाहीत.

            "पगडी ही केवळ डोक्यावरचं ओझं नाही, तर ती जबाबदारीची जाणीव आहे. जो पगडी घालतो, तो अन्यायाविरुद्ध उभा राहण्यासाठी बांधील असतो." वेशभूषा आपल्याला शिस्त आणि मर्यादा शिकवते. रंगांची ही उधळण जेव्हा एकत्र येते, तेव्हाच 'हिंद दी चादर' खऱ्या अर्थाने रंगीत आणि देखणी दिसते.

2. खाद्य संस्कृती: चवीतला ओलावा..

वेशभूषेच्या रंगांनंतर आपली नजर वळते ती तृप्त करणाऱ्या अन्नाकडे. अन्नाला आपण 'पूर्णब्रह्म' मानतो. अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात मिळणारा 'कडा प्रसाद' असो, काश्मीरमधील सुगंधी 'कावा' असो, किंवा पंढरपूरच्या वारीतली 'पिठलं-भाकरी'-या प्रत्येक चवीत एक 'सामाईक' ओलावा आहे. तो म्हणजे 'लंगर'ची संकल्पना.

            "खाद्य संस्कृती ही माणसाला माणसाशी जोडते. जेव्हा आपण एका पंगतीत बसून जेवतो, तेव्हा जात, पात आणि धर्म गळून पडतात. केवळ तृप्ती उरते." ही सामाईक पंगतच भारताची खरी ताकद आहे. जिथे अन्नाचा प्रत्येक घास 'सर्वांच्या भल्यासाठी' (सरबत दा भला) या भावनेतून दिला जातो, तिथे संस्कृतीची वीण अधिक घट्ट होते.

            3. व्यापार: विश्वासाचा पाया..

            जिथे पोटाची भूक भागते, तिथे प्रगतीची स्वप्नेही फुलतात. भारताचा व्यापार हा केवळ नफ्यावर आधारित नाही, तो 'विश्वासावर' उभा आहे. सिंधी बांधवांनी फाळणीनंतर शून्यातून विश्व उभं केलं, बंजारा आणि लबाना समुदायांनी तांड्यांच्या माध्यमातून प्राचीन काळी मालवाहतुकीची धुरा सांभाळली.

            व्यापारात 'जुबान' महत्त्वाची असते. एकदा शब्द दिला की तो पाळायचा, हा संस्कार आपल्याला या समुदायांनी दिला.

             "व्यापार हा केवळ आर्थिक व्यवहार नसून तो संस्कृतीचा प्रवास आहे. एका प्रांतातला माल जेव्हा दुसऱ्या प्रांतात जातो, तेव्हा त्यासोबत तिथले विचारही प्रवासाला निघतात." हा व्यापारच आपल्याला एकमेकांवर अवलंबून राहायला शिकवतो आणि याच 'परस्पर स्वावलंबना'तून देशाची एकता टिकून राहते.

            4. शैक्षणिक आणि साहित्यिक प्रगती: विचारांचे तेज..

            व्यापारातून लक्ष्मी येते, तर साहित्यातून सरस्वती नांदते. आपल्या संस्कृतीचा कणा आहे आपले साहित्य. काश्मिरी पंडितांनी जपलेली संस्कृतची परंपरा असो किंवा संत नामदेव महाराजांनी पंजाबमध्ये पोहोचवलेली 'अभंगवाणी'-साहित्याने कधीच भौगोलिक सीमा मानल्या नाहीत.

            आपली गुरुद्वारे ही केवळ प्रार्थनास्थळे नसून ती शिक्षणाची केंद्रेही आहेत. तिथे इतिहासाचे धडे दिले जातात, स्वसंरक्षणाचे धडे दिले जातात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 'मानवतेचा' धडा दिला जातो. "जेव्हा आपण एकमेकांचं साहित्य वाचतो, तेव्हा आपल्याला कळतं की, प्रत्येकाचं दुःख आणि आनंद सारखाच आहे." साहित्यिक प्रगती हीच समाजाची खरी वैचारिक प्रगती असते.

            5. गुरुद्वारा: मानवतेचं माहेरघर..

            या सर्व धाग्यांना एकत्र गुंफणारं पवित्र स्थान म्हणजे गुरुद्वारा. गुरुद्वाराच्या चारही दिशांना उघडणारी चार प्रवेशद्वारे हेच सांगतात की, "येथे कोणालाही मज्जाव नाही." जेव्हा दिल्लीत गुरु तेग बहादूरजींनी बलिदान दिलं, तेव्हा त्यांनी केवळ एका धर्माचं रक्षण केलं नाही, तर मानवाच्या श्रद्धेच्या अधिकाराचं रक्षण केलं.

            आजही जेव्हा देशावर संकट येतं, तेव्हा गुरुद्वारे सर्वात आधी मदतीचा हात पुढे करतात. हाच तो 'चादरी'चा सर्वात मजबूत कोपरा आहे. सानप साहेब अभिमानाने म्हणतात, "कट्टी सर, गुरुद्वारात मिळणारी शांतता ही जगात कुठेच मिळत नाही, कारण तिथे सेवा हाच परमेश्वर मानला जातो." आपणच आहोत ती चादर!

            अखेर ही 'हिंद दी चादर' म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपण भारतीय नागरिकच आहोत.

            जेव्हा आपण एकमेकांच्या वेशभूषेचा आदर करतो... जेव्हा आपण दुसऱ्याच्या खाद्य संस्कृतीचा आनंद घेतो...

            जेव्हा आपण व्यापारात प्रामाणिकपणा जपतो...

            आणि जेव्हा आपण साहित्यातून एकमेकांचे विचार समजून घेतो...

...तेव्हाच ही चादर अधिक मजबूत होते.

             "आपल्याला फाटलेली चादर शिवण्यापेक्षा, ती कधीच फाटू नये याची काळजी घेणारे 'दोरे' बनायचं आहे."

            प्रवास संपला नाही, तर तो "हिंद दी चादर" श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या 350 व्या शहिदी समागम या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि आपल्या आचरणातून आता खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे...!

लेखक...

विजयकुमार कट्टी

पर्यावरण संरक्षक व मार्गदर्शक,ठाणे

(संपर्क:-7977513822 )

000000000000


Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ

“पत्रकारितेची पाठशाळा - बातमी मागची गोष्ट” कार्यशाळा ठाण्यात उत्साहात संपन्न