ठाणे जिल्ह्यातील टँकरग्रस्त 33 गावे आणि 127 पाड्यांना जिल्हा परिषदेकडून वेळेत पाणी पुरवठा

 



 

ठाणे,दि.20(जिमाका) :- उन्हाचा कडाका वाढत असतानाच ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने अत्यंत तत्परता दाखवत जिल्ह्यातील टँकरग्रस्त भागांना मोठा दिलासा दिला आहे. पाणी टंचाई निवारण कार्यक्रमांतर्गत जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर राबवलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे दुर्गम भागातील नागरिकांची पाण्यासाठीची वणवण थांबवण्यात यश आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण 33 गावे आणि 127 पाड्यांमधील 50 हजार पर्यंत बाधित नागरिकांना प्रशासकीय नियोजनातून वेळेत आणि पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. 

जिल्ह्यात भौगोलिक परिस्थितीमुळे सर्वाधिक पाणी टंचाई जाणवणाऱ्या शहापूर तालुक्यात प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. शहापूरमधील 29 गावे आणि 119 पाड्यांमधील 45 हजार 673 नागरिकांना पाण्याची कमतरता भासू नये म्हणून जिल्हा परिषदेने तातडीने 34 खाजगी टँकर्स अधिग्रहित केले आहेत. या टँकर्सच्या माध्यमातून आतापर्यंत विक्रमी 4 हजार 067 खेपा पूर्ण करून ग्रामस्थांची पाण्याची गरज यशस्वीपणे भागवण्यात आली आहे. याच धर्तीवर मुरबाड तालुक्यातही प्रशासकीय यंत्रणा सतर्क असून, तेथील 4 गावे आणि 8 पाड्यांमधील 4 हजार 236 नागरिकांसाठी 3 टँकर्सद्वारे अविरत पाणी पुरवठा सुरू ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, प्रशासनाने आधीच केलेल्या योग्य नियोजनामुळे अंबरनाथ, भिवंडी आणि कल्याण या तालुक्यांमध्ये परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून, तिथे अद्याप पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झालेली नाही. 

ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी हा साप्ताहीक प्रगती अहवाल जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. संपूर्ण जिल्ह्यात एकूण 37 खाजगी टँकर्स अधिग्रहित करून प्रत्येक टंचाईग्रस्त पाड्यापर्यंत पाणी पोहोचवण्याची चोख व्यवस्था प्रशासनाने केली आहे. उन्हाळ्याच्या तीव्रतेचा अंदाज घेऊन प्रशासनाने आधीच पाणी टंचाई कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू केली आहे.

00000000000


Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ

“पत्रकारितेची पाठशाळा - बातमी मागची गोष्ट” कार्यशाळा ठाण्यात उत्साहात संपन्न