जेथे कष्टाला मान, तेथेच महाराष्ट्र महान महाराष्ट्र देशाचे उत्पादन हब - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 




ठाणे,दि.01 (जिमाका): "आजचा दिवस मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा, बलिदानाचा आणि जिद्दीचा आहे. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या उभारणीमध्ये कामगारांचे बहुमूल्य योगदान असून जेथे कष्टाला मान दिला जातो, तोच महाराष्ट्र खऱ्या अर्थाने महान ठरतो. आज महाराष्ट्र हे देशाच्या उत्पादनाचे प्रमुख हब म्हणून नावारूपास आले आहे," असे गौरवपूर्ण उद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.

            महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त ठाण्यातील पोलीस क्रीडा संकुल साकेत मैदान येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजवंदन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य मंत्र, शाहू-फुले-आंबेडकरांचा सामाजिक न्यायाचा विचार आणि यशवंतराव चव्हाणांनी आणलेला मंगलकलश या वारशाचा उल्लेख करत त्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेचा जागर केला.



            राज्याच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक आज महाराष्ट्रात येत असून समृद्धी महामार्ग, मेट्रोचे जाळे आणि मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक' यांसारख्या पायाभूत सुविधांच्या माध्यमातून आपण एक आधुनिक चमत्कार घडवून आणला आहे. पुढील दोन ते तीन वर्षांत आपण युएई आणि सिंगापूरच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकत देशातील पहिली एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होण्याचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

            तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे महिलांचा आत्मविश्वास वाढून त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.

            प्रशासकीय आघाडीवर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने ई-गव्हर्नन्समध्ये राज्यात तिसरा क्रमांक पटकावल्याबद्दल त्यांनी जिल्हा प्रशासनाचे विशेष कौतुक केले. जिल्ह्याला 'माझी वसुंधरा' अभियानात मिळालेला द्वितीय क्रमांक आणि ई-ऑफिसद्वारे झालेले 100 टक्के डिजिटल कामकाज ही जिल्ह्याच्या प्रगतीची लक्षणे असल्याचे त्यांनी नमूद केले.

            दळणवळणाच्या सोयींबद्दल माहिती देताना त्यांनी सांगितले की, वडाळा-ठाणे-मिरा भाईंदर आणि ठाणे-भिवंडी-कल्याण अशा मेट्रो मार्गांमुळे एमएमआर क्षेत्रातील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. याशिवाय ठाणे-बोरीवली टनेल, कोस्टल रोड आणि मुंबई-ठाण्यात सुरू होणारा 'पॉड टॅक्सी'चा नवीन उपक्रम शहराचा चेहरामोहरा बदलून टाकेल. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी राज्यात २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे अभियान राबवले जात असून ठाणे जिल्ह्यात दरवर्षी किमान एक लाख वृक्ष लावण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. यंदा 'एल निनो'च्या प्रभावामुळे पाऊस कमी होण्याचा अंदाज असल्याने पाण्याचे योग्य नियोजन आणि जलयुक्त शिवारची कामे वेगाने पूर्ण करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

            तसेच 16 मे पासून सुरू होणाऱ्या देशातील पहिल्या डिजिटल जनगणनेसाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

            या सोहळ्यात विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सुरक्षा मंडळातील बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा सानपाडा येथे कार्यरत असलेल्या मयूर धोंडू देशमुख, योगेश वसंत पवार, संदिपकुमार लालजी मौर्य, अविनाश कालिदास शिंदे, दत्तात्रेय प्रल्हाद अवघडे, मोहिनी प्रदिप शिंदे या सुरक्षा रक्षकांना मानचिन्ह व प्रशस्ती पत्रक देण्यात आले. 

            राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ठाणे जिल्ह्यातील 2026 मधील भिवंडी तालुक्यात सार्वत्रिक औषधोपचार मोहीम उल्लेखनीयरित्या राबविल्याबद्दल उपसंचालक डॉ.अशोक नांदापूरकर, भिवंडी उपविभागीय अधिकारी अमित सानप, आरोग्य सहसंचालक डॉ. मनिष रेगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जिल्हा हिवताप नियंत्रण अधिकारी डॉ.संतोषी शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नलिनी ठोंबरे, हत्तीरोग अधिकारी दिपाली नासरे यांना प्रशस्तीपत्रक व मानचिन्ह  देऊन गौरविण्यात आले.

            महिला व बालविकास विभागांतर्गत राज्यातील समाज सेविकांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जिल्हास्तरीय पुरस्कार प्रमाणपत्र, मानचिन्ह व धनादेश देण्यात आले. त्यातील पुरस्कृत सन 2020-21 मधील कल्पना जितेश मोरे, सन 2021-22 मधील सई लेले, सन 2022-23 मधील अरुंधती अशुतोष भालेराव, सन 2023-24 मधील सुनंदा देवस्थळी यांना या कार्यक्रमाप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते  पुरस्कार प्रदान करण्यात आले.

            याप्रसंगी आमदार संजय केळकर, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे मनपा आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव, पोलीस अधीक्षक डॉ.डी.स्वामी यांच्यासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, पोलीस सह आयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण, पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त पराग मनेरे, मीना मकवाना, पंकज शिरसाट, डॉ.श्रीकांत परोपकारी, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदिप माने, उपजिल्हाधिकारी (सर्वसाधारण) रुपाली भालके, उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के पाटील, शशिकांत गायकवाड, वरुणकुमार सहारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार, डॉ.अर्चना पवार, जिल्हा हिवताप नियंत्रण अधिकारी डॉ.संतोषी शिंदे, जिल्हा परिषद उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, प्रमोद काळे, तहसिलदार सचिन चौधर, उमेश पाटील, रेवण लेंभे, प्रदीप कुडाळ, जिल्हा प्रशासनातील इतर अधिकारी-कर्मचारी, पोलीस विभागाचे अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.

अनेक वरिष्ठ अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक आणि नागरिक उपस्थित होते.

            'वंदे मातरम्' आणि राज्यगीताच्या निनादात या सोहळ्याची सांगता झाली.

00000000000


Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ

“पत्रकारितेची पाठशाळा - बातमी मागची गोष्ट” कार्यशाळा ठाण्यात उत्साहात संपन्न