जनभागीदारी अभियानांतर्गत दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना विविध शासकीय योजनांचा लाभ; शहापूरमध्ये विशेष शिबिराचा उत्साहात शुभारंभ

 


 


 

              ठाणे दि.20(जिमाका) :- जनभागीदारी अभियानांतर्गत ठाणे जिल्ह्यातील सर्वात दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ मिळवून देण्यासाठी एका विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शहापूर तालुक्यातील चिंध्यावीवाडी येथील अनुदानित आश्रमशाळेत  सकाळी १० वाजता या शिबिराचा शुभारंभ अत्यंत उत्साहात पार पडला. शासनाच्या कल्याणकारी योजना थेट गरजूंपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे.

या अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ठाकणे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच एकनाथ मथा तसेच लायचीवाडीचे सरपंच श्री. रामदास वाघ प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच, प्रशासकीय पातळीवरून सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री. अरविंद जाधव, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. रवींद्र घोलप व श्री. के. एम. शिंदे, आदिवासी निरीक्षक श्री. योगेश पाटील, ग्राम महसूल अधिकारी श्री. हरीश पारधी, सहाय्यक कृषी अधिकारी श्री. विशाल कनोजे, बँक ऑफ महाराष्ट्रच्या श्रीमती सविता पावसकर व श्री. मनोज शिरसाळे आणि आश्रमशाळेचे मुख्याध्यापक श्री. सावंत यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

विविध योजनांचे थेट वाटप आणि मार्गदर्शन दुर्गम भागातील नागरिकांना एकाच छताखाली सर्व शासकीय सेवा मिळाव्यात, यासाठी या शिबिरामध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये खालील महत्त्वाच्या योजनांचे मार्गदर्शन आणि लाभ वितरण करण्यात आले:

नवीन आधार कार्ड नोंदणी, दुरुस्ती आणि रेशन कार्ड संदर्भातील कामे. पीएम गरीब कल्याण अन्न योजना' आणि 'पीएम उज्ज्वला योजना' (गॅस जोडणी). आयुष्यमान भारत कार्ड', 'पीएम जीवन ज्योती विमा योजना' आणि 'पीएम सुरक्षा विमा योजना'. पीएम किसान सन्मान निधी योजना', 'किसान क्रेडिट कार्ड', 'पीएम जनधन योजना' आणि 'सुकन्या समृद्धी योजना'. शासनाच्या विविध पेन्शन योजना  संदर्भातील मार्गदर्शन व लाभ वितरण करण्यात आले.

२५ मे पर्यंत अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, शहापूर यांच्या वतीने या विशेष उपक्रमासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. हे अभियान दिनांक १८ मे २०२६ ते २५ मे २०२६ या कालावधीत सुरू राहणार आहे. या मोहिमेमुळे शहापूर तालुक्यातील दुर्गम भागातील अनुसूचित जमातीच्या (आदिवासी) नागरिकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार असून, सर्व गरजू बांधवांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

                                                                          000000         


Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ

“पत्रकारितेची पाठशाळा - बातमी मागची गोष्ट” कार्यशाळा ठाण्यात उत्साहात संपन्न