एल निनोच्या संभाव्य धोक्याविरुद्ध ठाणे जिल्हा कृषी विभाग सज्ज जिल्ह्यात राबवणार १०८० 'जलतारा' उपचार

 


 

            ठाणे,दि.22(जिमाका) :- भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार साल 2026 हे एल निनोचे वर्ष असल्याने कृषी क्षेत्रावर त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनची वाटचाल मंदावणे, पावसाचे आगमन उशिरा होणे, पावसात मोठा खंड पडणे आणि एकूणच पर्जन्यमान कमी राहणे अशा समस्या उद्भवू शकतात. याचा थेट फटका खरीप हंगामातील पेरण्यांना बसू शकतो आणि शेतकऱ्यांवर दुबार पेरणी किंवा पुनर्लागवडीची वेळ येऊ शकते. मातीतील ओलावा वेगाने कमी झाल्यामुळे पिकांवर ताण येतो, तसेच फुलोरा व दाणे भरण्याच्या महत्त्वपूर्ण अवस्थेत पाण्याचे दुर्भिक्ष जाणवल्यास अन्नधान्य उत्पादनात मोठी घट होऊ शकते. संभाव्य दुष्काळी परिस्थितीमुळे जलस्त्रोतांमधील साठा घटून भूजल पातळी खाली जाण्याची आणि उच्च तापमानामुळे बाष्पीभवन वाढून पिकांची पाण्याची गरज वाढण्याची भीती आहे. या नकारात्मक परिणामांना तोंड देण्यासाठी  शासनाचा कृषी विभाग आणि ठाणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय पूर्णपणे सज्ज झाले आहे. 

            या संभाव्य संकटाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमध्ये व्यापक जनजागृती करण्यासाठी ठाणे जिल्ह्यात विशेष 'शिवार फेऱ्यांचे' आयोजन करण्यात आले आहे. या शिवार फेऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना अमलात आणण्याचे आवाहन केले जात आहे. यामध्ये प्रामुख्याने मूलस्थानी जलसंधारण करणे, जसे की जमिनीच्या उताराला आडवी नांगरणी व पेरणी करणे, आंतरमशागत, मृत सरी काढणे, रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब करणे आणि आच्छादनाचा वापर करणे याविषयी मार्गदर्शन केले जात आहे. याशिवाय, पिकांना संरक्षित सिंचन उपलब्ध व्हावे यासाठी शेततळे, जलकुंड आणि प्लास्टिक अस्तरीकरण यांसारख्या घटकांना प्रोत्साहन दिले जात आहे. तसेच मृद व जलसंधारणासाठी जुभादु, मजगी, जलतारा, शेत शोषखड्डा यांसारखे क्षेत्र उपचार आणि माती नाला बांध, अनघड दगडी बांध, गॅबियन व वनराई बंधारे यांसारखे नाला उपचार राबविण्यावर भर दिला जात आहे. 

            या सर्व उपायांमध्ये भूजल पातळी वाढविण्यासाठी 'जलतारा' उपचार हा एक अत्यंत प्रभावी आणि वरदान ठरणारा उपाय ठरत आहे. 'कॅच द रेन व्हेन इट फॉल्स, व्हेअर इट फॉल्स' या संकल्पनेवर आधारित या उपक्रमात, शेतजमिनीच्या प्रत्येक एक एकर क्षेत्रातील उताराची जागा शोधून जलतारा खड्डा तयार केला जातो. सामान्यतः पडणाऱ्या पावसाचे ३५ टक्के पाणी वाहून जाते, परंतु जलतारा उपचाराच्या माध्यमातून हे वाहून जाणारे पाणी अडवून जमिनीत जिरवणे शक्य होते. यामुळे सिंचन विहिरींच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ होते आणि अतिरिक्त पाण्यामुळे जमीन चिबड होण्यापासून तिचा बचाव होतो. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रौढ व्यक्तींना अकुशल कामाची संधी देत शेतकऱ्यांसाठी संरक्षित सिंचनाची व्यवस्था करणे हा यामागचा मुख्य हेतू आहे. 

'जलतारा' उपचाराची रचना अत्यंत सोपी आणि शास्त्रोक्त आहे. यासाठी शेताच्या निवडलेल्या उतार भागात फूट रुंद, ५ फूट लांब आणि ६ फूट खोल (१.५ मीटर \times १.५ मीटर \times १.८० मीटर) आकाराचा खड्डा तयार केला जातो. हा खड्डा प्रामुख्याने ८० मिमी आणि १०० मिमी आकाराच्या मोठ्या व कठीण प्रकारच्या दगडांनी (टोळ) भरला जातो, ज्यावर मध्यम आकाराचे दगड, गारगोटे आणि वरच्या भागात छोटे दगड, खडे व वाळूचा थर दिला जातो. असा हा एक सिंगल जलतारा खड्डा अवघ्या ४ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ३.६० लक्ष लिटर पाणी जमिनीमध्ये मुरवण्याची क्षमता ठेवतो. यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज असल्याने पडणारा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवणे आवश्यक बनले आहे. याच उद्देशाने ठाणे जिल्हा कृषी विभागाने जिल्ह्यात एकूण १०८० जलतारा खड्डे तयार करण्याचे महत्त्वाकांक्षी नियोजन केले असून, जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी आपल्या शेतात जास्तीत जास्त जलतारा खोदावेत असे आवाहन ठाणे जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे यांनी केले आहे.

00000000000


Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ

“पत्रकारितेची पाठशाळा - बातमी मागची गोष्ट” कार्यशाळा ठाण्यात उत्साहात संपन्न