घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाच्या अडचणी दूर होण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे -जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

 




 ठाणे,दि.12,(जिमाका) :- गायमुख ते फाउंटन दरम्यानचा रस्ता रुंद करण्यासाठी वनविभागाच्या अडचणी दूर करण्यासाठी  संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले आहेत. ठाणे आणि मिरा भाईंदर या दोन शहरांना जोडणाऱ्या घोडबंदर मार्गाच्या रुंदीकरणासंदर्भात वन विभागाच्या तांत्रिक अडचणी संदर्भातील आढावा बैठक आज जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी घेतली. ही बैठक ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समितीसभागृहात संपन्न झाली.

घोडबंदर मार्गावरुन अवजड वाहनांची वाहतुक मोठ्याप्रमाणात होते. तसेच मिरा भाईंदर, वसई-विरार या भागाला हा मार्ग ठाणे, नवी मुंबईशी जोडतो. मार्गाच्या रुंदीकरणात वन विभागाकडून परवानग्या मिळत नसल्याने रुंदीकरणाचे काम रखडलेले आहे. मिरा-भाईंदर आणि ठाणेकरांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या घोडबंदर ते फाउंटन हॉटेल आणि फाउंटन हॉटेल ते गायमुख या दोन्ही टप्प्यांवरील रस्ता रुंदीकरण व विकासकामांना गती देण्यासाठी वनविभागाचा ना-हरकत दाखला अत्यंत महत्त्वाचा आहे. दोन्ही महापालिकांनी आपले प्रस्ताव वनविभागाकडे सादर केले असले, तरी विभागाने सुचविलेल्या त्रुटी तातडीने दूर करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी दिले.

यावेळी निवासी जिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान युऊर-बोरीवलीचे उपसंचालक प्रदीप पाटील, सहायक वन संरक्षक सोनल वळवी, मयूर खुटवसे, इको फूट फॉरवर्डचे हेड अमोल कुंभार, प्रकल्प अधिकारी सिध्देश सांगरे, प्र. माहिती अधिकारी प्रवीण डोंगरदिवे उपस्थित होते.

0000000000


Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ

“पत्रकारितेची पाठशाळा - बातमी मागची गोष्ट” कार्यशाळा ठाण्यात उत्साहात संपन्न