बनावट नियुक्ती पत्रांपासून सावधान! जिल्हा प्रशासनाचे आवाहन; गुन्हा दाखल करण्याचे आदेश
ठाणे,दि.26(जिमाका):- ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात 'लिपिक टंकलेखक' या
पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दोन महिलांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार
उघडकीस आला आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनानुसार
निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदिप माने यांनी ठाणे शहर पोलीस निरीक्षकांना पत्र लिहून
सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
ॲड.प्रतिभा माळी यांच्या नातेवाईक असलेल्या श्रीमती वृषाली जाधव आणि
श्रीमती मृणाली माळी या दोघांना जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिक टंकलेखक पदावर नियुक्ती
मिळाल्याचे बनावट आदेश देण्यात आले होते. हे नियुक्ती पत्र घेऊन त्या 24 डिसेंबर
2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू होण्यासाठी गेल्या होत्या. संबंधित महिलांनी
सादर केलेली कागदपत्रे आणि वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्रे पाहिल्यानंतर, ती प्रथमदर्शनी
बनावट असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निदर्शनास आले. जिल्हा प्रशासनाने अधिक
चौकशी केली असता, सतीश संजय वानखेडे नामक व्यक्तीने ही बनावट नियुक्ती पत्रे दिल्याचे
स्पष्ट झाले आहे. 'विभागीय अंतर्गत अनुशेष भरती' अंतर्गत नोकरी लावून देतो, असे सांगून
या व्यक्तीने संबंधितांचा विश्वास संपादन केला आणि त्यांची फसवणूक केली.
सरकारी कार्यालयाचे बनावट शिक्के, दिशाभूल करणारा मजकूर आणि बनावट
स्वाक्षरीचा वापर करण्यात आल्याच्या घटना अलीकडे लक्षात आल्या आहेत. ही केवळ एका व्यक्तीची
कृती नसून उमेदवारांची फसवणूक करणारी एखादी संघटित टोळी विशेषतः ठाणे, पालघर, नाशिक
या भागात कार्यरत असण्याची शक्यता जिल्हाधिकारी कार्यालयाने व्यक्त केली आहे.
त्यानुषंगाने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ
यांच्या सूचनेनुसार निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदिप माने यांनी पोलिसांना या प्रकरणाची
तातडीने सखोल चौकशी करावी, बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या मुख्य सूत्रधाराचा शोध घ्यावा,
दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करून केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करावा, अशा लेखी सूचना
दिल्या आहेत.
या घटनेमुळे सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांनी सावध राहण्याचे
आवाहन करण्यात येत असून, कोणत्याही अनधिकृत व्यक्तीच्या आमिषाला बळी पडू नये, तसेच
अशी काही घटना लक्षात आल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांशी संपर्क
साधावा, असे जिल्हा प्रशासनाकडून सूचित करण्यात आले आहे.
00000000
Comments
Post a Comment