दि.20 जून, 2026 रोजी देशभरात साजरा होणार पी.एम.किसान उत्सव दिवस पंतप्रधानांच्या शुभहस्ते दि. 20 जूनला 'पी.एम. किसान'च्या 23 व्या हप्त्याचे वितरण
ठाणे,दि.17(जिमाका)
:-
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा माहे एप्रिल 2026 ते जुलै 2026 कालावधीतील 23
वा हप्ता मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते दि.20 जून, 2026 रोजी पश्चिम
बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर येथून वितरीत होणार आहे. या प्रसंगाचे
औचित्य साधून केंद्र शासनाने दि. 20 जून, 2026 हा दिवस संपूर्ण देशभर पी. एम.
किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे करण्याचे ठरविले आहे.
केंद्र शासनाने शेतकऱ्यांना
निश्चित उत्पन्न देण्याकरीता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी. एम. किसान)
योजना माहे फेब्रुवारी, 2019 पासून सुरु केली आहे. या
योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी
व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) रु.2000/- प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रू.6000/- त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात लाभ जमा करण्यात येत आहे. पी. एम.
किसान योजने अंतर्गत राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना यापूर्वी एकूण 22 हप्त्यांमध्ये सुमारे रू.41083.00 कोटीचा लाभ जमा
झालेला आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान
निधी (पी. एम. किसान) योजनेच्या लाभासाठी केंद्र शासनाकडून लाभार्थीने भूमी अभिलेख
नोंदणी अद्यावत करणे, बँक खाते आधार संलग्न करणे व ई-केवायसी प्रमाणिकरण करणे या
बाबी बंधनकारक केलेल्या आहेत. राज्यातील सद्यस्थितीत या तीनही बाबीची पूर्तता
केलेल्या एकूण 90.85 लाख शेतकरी कुटुंबांना दि. 20 जून, 2026 रोजी सुमारे रक्कम
रुपये 1817.00 कोटी इतक्या रक्कमेचा लाभ त्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात थेट
हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे. पी.एम.किसान योजनेच्या लाभासाठी लाभार्थीकडे
फार्मर आय.डी. असणे देखील केंद्र शासनाने क्रमप्राप्त केले आहे. राज्यातील कृषी
विज्ञान केंद्र तसेच जिल्हा, तालुका व ग्राम पंचायत स्तरावर,
कृषी उत्पन्न बाजार समिती, विविध कार्यालये,
संशोधन केंद्रे, शेतकरी उत्पादक कंपनी (FPCs),
शेतकरी उत्पादक संघटना (FPOs), सहकारी
पतसंस्था (PACS) याठिकाणी सदरचा समारंभ आयोजित करण्यात येणार
आहे. नागरी सुविधा केंद्रांवरुनही या
संमारभाच्या थेट प्रक्षेपणामध्ये सहभागी होता येईल.
राज्यांमध्ये सर्वदूर कृषी
विभाग, महसूल व वने विभाग, तसेच ग्राम विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने
सदरचा समारोह साजरा करण्यात येणार आहे. सदरच्या समारोहाचे थेट प्रक्षेपण केंद्र
शासनाच्या https://pmindiawebcast.nic.in
या लिंक वरून होणार आहे. सदरच्या लिंकचा वापर करून राज्यातील जास्तीत
जास्त शेतकरी बंधु भगिनींनी या समारोहामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक, कोकण विभाग, ठाणे शिवाजी आमले यांनी केले आहे.
0000000000
Comments
Post a Comment