जिल्हा क्रीडा अधिकारी ठाणे अंतर्गत आयोजित उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीर 2026

 


 


 

            ठाणे,दि.3(जिमाका) : ठाणे जिल्ह्यात क्रीडा क्षेत्रात होत असलेली उल्लेखनीय कामगिरी ही संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब ठरत आहे. ठाणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंचा शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग  व्हावा, विद्यार्थ्यांना विविध खेळांची माहिती व्हावी या उद्देशाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ठाणे द्वारा आयोजित मोफत उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि.10 ते 20 जून 2026 दरम्यान जिल्हा क्रीडा अधिकारी ठाणे सुवर्णा बारटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे.

या उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीरामध्ये जिम्नॅस्टीक्स्, हॅन्डबॉल, खो-खो, पॉवरलिफ्टींग, रग्बी या खेळांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यापैकी हॅन्डबॉल, पॉवरलिफ्टींग, रग्बी या खेळांचे प्रशिक्षण बी.के. बिर्ला महाविद्यालय, कल्याण ठाणे येथे तसेच जिम्नॅस्टीक्स् आणि वेटलिफ्टींग या खेळांचे प्रशिक्षण तालुका क्रीडा संकुल, ठाणे कोपरी, ठाणे, तसेच खो खो या खेळाचे प्रशिक्षण शिबीर शाळा क्रं.76, घणसोली, जि. ठाणे  येथे होणार आहे. त्याचबरोबर प्रशिक्षण शिबीरादरम्यान आहारतज्ञ तसेच तज्ञ फिजीओथेरपीस्ट यांच्यासमवेत चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील नवोदित आणि होतकरू खेळाडूंसाठी या शिबिराचे आयोजन केले असल्याने या उन्हाळी प्रशिक्षण शिबीरामध्ये सहभागी होणेकरीता खेळाडूंना आवाहन करण्यात येत आहे. इच्छूक विद्यार्थी आणि विद्यार्थींनींसाठी प्रवेश अर्जाकरीता गुगल फॉर्म उपलब्ध करून देण्यात येत आहे. हा गूगल लिंक पुढील प्रमाणे आहे.

https://forms.gle/rQRtiFKiS6Rivfhw5  

0000000


Comments