ठाणे जिल्हा मतदार यादीचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर; 30 जूनपासून 'बीएलओ' घरोघरी भेट देणार
ठाणे,दि.29 (जिमाका):- भारत
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ठाणे जिल्ह्यात विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम
(SIR) राबवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, मतदार यादी अधिक अचूक व पारदर्शक करण्यासाठी
ठाणे जिल्ह्यातील सर्व मतदारांनी दि. 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत आपल्या भागात
येणाऱ्या केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (BLO) सहकार्य करावे, आपले गणनाप्रपत्र भरून देऊन
त्याची रीतसर पोहोच घ्यावी, असे आवाहन ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी
डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज येथे केले आहे.
विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाबाबत विविध राजकीय
पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यासाठी आज जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या
अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात एक महत्त्वाची बैठक संपन्न
झाली. या बैठकीला उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) रुपाली भालके, उपजिल्हा निवडणूक
अधिकारी वैशाली माने, अतिरिक्त आयुक्त तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी प्रशांत
रोडे, विठ्ठल डाके, योगेश गोडसे, सुनील पवार, धीरज चव्हाण, तहसिलदार प्रदीप कुडाळ तसेच
विविध मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे जिल्हा पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत माहिती देताना जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण
पांचाळ यांनी सांगितले की, ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांमधील एकूण 6 हजार
894 मतदान केंद्रांशी जोडलेल्या 74 लाख 50 हजार 515 मतदारांची पात्रता या विशेष मोहिमेअंतर्गत
तपासली जाणार आहे. यासाठी मतदार नोंदणी अधिकारी (ERO) आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी
(AERO) यांची नियुक्ती व भाग निहाय जबाबदारी निश्चित करण्यात आली असून, सध्या सुरू
असलेल्या 'SIR Mapping' या ऑनलाईन मॅपिगच्या टक्केवारीचा आढावाही या बैठकीत घेण्यात
आला.
या मोहिमेच्या स्वरूपाविषयी सांगताना जिल्हाधिकाऱ्यांनी
स्पष्ट केले की, दि. 30 जून ते दि.29 जुलै 2026 या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी
घरोघरी भेट देऊन गणना प्रपत्र भरून घेतील. यामध्ये नाव, लिंग, वय, नातेसंबंध, मोठ्या
संख्येने वंशज जोडणी असल्यास, पालकांच्या तपशिलातील तफावत आणि जुळवणी न झालेले मतदार
यांच्या माहितीचे वर्गीकरण व चिन्हांकन केले जाईल. जे मतदार उपलब्ध झाले नाहीत, स्थलांतरित
झाले आहेत, मृत आहेत किंवा ज्यांची दुहेरी नोंद आहे, अशा मतदारांची केंद्रनिहाय यादी
मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, पंचायत समिती, सर्व महानगरपालिकांचे
मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा आयुक्त आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर
प्रसिद्ध केली जाईल.
यानंतर दि.5 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार यादी
प्रसिद्ध केली जाईल आणि ज्यांचे मॅपिंग झालेले नाही किंवा ज्यांच्या माहितीत विसंगती
आहे, अशा मतदारांची रीतसर सुनावणी घेतली जाईल.
दि. 5 ऑगस्ट ते दि.4 सप्टेंबर 2026 या दावे व
हरकतींच्या कालावधीत मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे दावे व हरकती स्वीकारल्या जातील आणि
त्यांची यादी नोटीस बोर्डवर प्रसिद्ध केली जाईल. यासाठी नवीन मतदार नोंदणीकरिता फॉर्म
6, नाव वगळण्यासाठी फॉर्म 7, दुरुस्तीसाठी व स्थलांतरणसाठी फॉर्म 8 भरावा लागणार आहे.
प्राप्त होणाऱ्या नमुना 6 ची यादी नमूना 9, नमुना 7 ची यादी नमूना 10, नमुना 8 दुरुस्तीबाबत
नमुना 11, स्थलांतरणासाठी (मतदार संघात स्थलांतरण 11A व मतदार संघाबाहेरील स्थलांतरण
11B) मध्ये यादी मतदार नोंदणी अधिकारी यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मतदाराचा
2026 च्या यादीतील छापील तपशील, गणना प्रपत्र आणि घोषणापत्राशिवाय नवीन नोंद केली जाणार
नाही, अशी सूचना यावेळी राजकीय पक्षांना देण्यात आली.
मतदाराचा 2026 च्या यादीतील छापील तपशील, गणना
प्रपत्र आणि घोषणापत्राशिवाय नवीन नोंद केली जाणार नाही, अशी सूचना यावेळी राजकीय पक्षांना
देण्यात आली. ज्या भागात 40 टक्क्यांपेक्षा कमी यादी भाग आहे, तेथे राजकीय पक्षांनी
जास्तीत जास्त लक्ष देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
या विशेष मोहिमेत नागरिकत्वाच्या पुराव्याबाबत
महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जर जन्म भारतात 1 जुलै
1987 पूर्वी झाला असेल तर स्वतःची जन्मतारीख किंवा जन्मस्थळ सिद्ध करणारा कोणताही एक
वैध दस्तऐवज आवश्यक राहील. जन्म 1 जुलै 1987 ते 2 डिसेंबर 2004 या कालावधीत झाला असल्यास
आई किंवा वडील यांच्यापैकी कोणाचाही भारतातील जन्माचा पुरावा जोडावा लागेल. 2 डिसेंबर
2004 नंतर भारतात जन्म झालेल्यांच्या पालकांपैकी कोणी भारतीय नागरिक नसल्यास, अर्जदाराच्या
जन्माच्या वेळचा त्यांचा वैध पासपोर्ट आणि व्हिसाची प्रत सादर करावी लागेल. भारताबाहेर
जन्म झालेल्यांसाठी परदेशातील भारतीय दूतावासाने जारी केलेला जन्मनोंदणीचा पुरावा आणि
नागरिकीकरणाद्वारे नागरिकत्व मिळालेल्यांसाठी नागरिकत्व नोंदणी प्रमाणपत्र घोषणापत्रासोबत
सादर करणे बंधनकारक राहील.
'पात्र असलेल्या कोणत्याही नागरिकाचे नाव मतदार
यादीतून सुटणार नाही आणि कोणत्याही अपात्र व्यक्तीचा मतदार यादीत समावेश होणार नाही'
हे भारत निवडणूक आयोगाचे या कार्यक्रमाचे मुख्य घोषवाक्य व उद्दिष्ट आहे.
अंतिम मतदार यादी छपाई होईपर्यंत प्रशासनातर्फे
दर आठवड्याला आढावा बैठक घेतली जाणार असून, या बैठकांना राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी
नियमित उपस्थित राहावे, असे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सूचित केले आहे.
त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांनी
या राष्ट्रीय कार्यात प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असेही आवाहन शेवटी जिल्हा प्रशासनाकडून
करण्यात आले आहे.
000000000

Comments
Post a Comment