ठाणे जिल्हा प्रशासनाचा संवेदनशील पुढाकार टंचाईग्रस्त 39 गावे आणि 127 पाड्यांसाठी तातडीने 40 टँकर तैनात, ग्रामीण भागाला मोठा दिलासा

 




 

            ठाणे,दि.०३(जिमाका) :- उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे निर्माण झालेल्या ग्रामीण भागातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाने अत्यंत तत्परता दाखवत युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत.

            ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत नागरिकांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबवण्यासाठी आणि त्यांना अखंडित पाणी पुरवठा करण्यासाठी चोख नियोजन करण्यात आले आहे.   

            जिल्ह्यातील टंचाईग्रस्त ३९ गावे आणि १२७ पाड्यांची (एकूण १६६ लोकवस्त्या) तहान भागवण्यासाठी प्रशासनाने तातडीने ४० पाण्याच्या टँकरद्वारे अविरत पुरवठा सुरू केला असून, याद्वारे सुमारे ५८ हजार ४४३ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

            प्रशासनाच्या सतर्कतेमुळे जिल्ह्यातील पाच तालुक्यांपैकी अंबरनाथ, भिवंडी आणि कल्याण या तीन तालुक्यांमध्ये सद्य:स्थितीत पाणी टंचाईची कोणतीही गंभीर समस्या उद्भवलेली नाही, तसेच तिथे टँकरची गरज भासलेली नाही. मात्र, भौगोलिक परिस्थितीमुळे दुर्गम असलेल्या मुरबाड आणि शहापूर या दोन तालुक्यांमध्ये प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

            मुरबाड तालुक्यातील ६ गावे आणि १० पाड्यांमधील ५ हजार ६६६ नागरिकांसाठी प्रशासनाने ३ शासकीय आणि ३ खाजगी अशा एकूण ६ टँकर्स मंजूर करून तिथे पाण्याचे फेरे नियमितपणे सुरू ठेवले आहेत, ज्यामुळे ग्रामस्थांची भटकंती पूर्णपणे थांबली आहे. 

            तसेच,भौगोलिकदृष्ट्या अत्यंत दुर्गम आणि पाणी टंचाईचा सर्वाधिक फटका बसलेल्या शहापूर तालुक्यासाठी जिल्हा प्रशासनाने अत्यंत कौतुकास्पद व वेगवान पावले उचलली आहेत.

            शहापूरमधील ३३ गावे आणि १२७ पाड्यांमधील एकूण ५२ हजार ७७७ नागरिकांची पाण्याची गरज ओळखून प्रशासनाने तात्काळ ३७ खाजगी टँकर्स अधिग्रहित करून तैनात केले आहेत. संपूर्ण जिल्ह्यातील एकूण ४० टँकर्सपैकी ३७ टँकर्स शहापूर तालुक्यात कार्यान्वित करून प्रशासनाने दुर्गम भागातील जनतेप्रति आपली संवेदनशीलता आणि कर्तव्यदक्षता सिद्ध केली आहे. 

            जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या थेट मार्गदर्शनाखाली आणि संनियंत्रणाखाली ही संपूर्ण मोहीम अत्यंत पारदर्शकपणे राबवली जात आहे. १८ मे २०२६ ते २५ मे २०२६ या साप्ताहिक कालावधीत मंजुरी मिळाल्यापासून प्रत्येक टँकरच्या फेऱ्यांचे अचूक वितरण होईल आणि नागरिकांना वेळेवर पाणी मिळेल, यावर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी डिजिटल प्रणालीद्वारे लक्ष ठेवून आहेत.

0000000


Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ

“पत्रकारितेची पाठशाळा - बातमी मागची गोष्ट” कार्यशाळा ठाण्यात उत्साहात संपन्न