ठाणे जिल्ह्यात "माझं गाव - आरोग्य संपन्न गाव" अभियानाला गती सर्व 427 ग्रामपंचायतींचा उत्स्फूर्त सहभाग, आरोग्यविषयक विविध उपक्रमांचे आयोजन
ठाणे दि.03 (जिमाका)
:- राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी "माझं गाव
- आरोग्य संपन्न गाव" अभियानाला ठाणे
जिल्ह्यात अत्यंत उत्साही आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ठाणे जिल्हाधिकारी डॉ.
श्रीकृष्ण पांचाळ व मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली
तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे
यांच्या थेट अधिपत्याखाली जिल्हाभरात विविध आरोग्यविषयक उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात
येत आहेत. ग्रामस्तरावरील जनसहभागातून गावागावांमध्ये आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यासाठी
प्रशासनाकडून सध्या व्यापक प्रयत्न करण्यात येत असून, विविध उपक्रमांचे आयोजन केले
जात आहे.
या अभियानाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ठाणे जिल्ह्यातील सर्वच्या सर्व ४२७ ग्रामपंचायतींनी या अभियानासाठी आपली नोंदणी पूर्ण केली असून ग्रामपंचायत स्तरावर
नागरिकांचा याला प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. अभियानाच्या जिल्ह्यातील प्रभावी अंमलबजावणीसाठी
प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केले असून, आजअखेर तालुका स्तरावर ५ मोठे मेळावे, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर ३३ मेळावे
तसेच उपकेंद्र स्तरावर तब्बल १७५
मेळावे यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आले आहेत. या आयोजित मेळाव्यांच्या माध्यमातून
ग्रामीण भागातील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी, आजारांचे अचूक निदान आणि उपचार केले
जात असून, शासनाच्या विविध आरोग्यविषयक कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती देऊन मोठ्या
प्रमाणावर आरोग्यविषयक जनजागृती निर्माण करण्यात येत आहे.
शासन निर्णयानुसार
हे अभियान सातत्याने पुढे नेण्यात येणार असून, चालू माहे जून २०२६ मध्ये अभियानांतर्गत
जिल्हाभरात अनेक महत्त्वपूर्ण आणि आरोग्याभिमुख उपक्रम राबविण्याचे निश्चित करण्यात
आले आहे. यामध्ये प्रामुख्याने तालुका आरोग्य संपन्न गाव कृती दल समितीच्या बैठकांचे
आयोजन करणे तसेच ग्रामपंचायत स्तरावरील आरोग्य संपन्न गाव कृती दल समितीच्या बैठका
नियमितपणे घेऊन स्थानिक पातळीवर आरोग्याचा कृती आराखडा तयार केला जाणार आहे.
या मोहिमेत भावी पिढीच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्यात आले असून, शाळा व अंगणवाडीतील
लहान मुलांना वैयक्तिक स्वच्छता आणि सकस व सकस आहाराचे महत्त्व अतिशय सोप्या भाषेत
पटवून दिले जाईल. त्याचप्रमाणे किशोरवयीन मुलामुलींसाठी वैयक्तिक स्वच्छता, जीवन कौशल्य
प्रशिक्षण, विशेष वैद्यकीय शिबिरे व किशोरवयीन आरोग्य दिन यांसारख्या नाविन्यपूर्ण
उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. येत्या दि. १० ते १६ जून या कालावधीत संपूर्ण ठाणे जिल्ह्यात नेत्ररोगांमधे वाढती समस्या लक्षात
घेता नेत्ररोगांबाबत व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असून नागरिकांच्या डोळ्यांच्या
आरोग्याची काळजी घेतली जाईल.
पर्यावरण आणि आरोग्याची सांगड घालत या अभियानांतर्गत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण
कार्यक्रम राबविले जातील. तसेच निरोगी जीवनशैलीसाठी योगाचे महत्त्व पटवून देण्यासाठी
विशेष जनजागृती केली जाणार असून, दररोज किमान १०० नागरिकांना तज्ज्ञांमार्फत
योगाचे शास्त्रोक्त प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जून महिना हा कीटकजन्य
आजार प्रतिबंध महिना म्हणून पाळला जात असल्याने, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू,
मलेरिया यांसारख्या घातक कीटकजन्य आजारांची लक्षणे आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत
नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यात येणार आहे. यासोबतच सार्वजनिक स्वच्छतेचा भाग
म्हणून घरातील कचऱ्याचे वर्गीकरण आणि त्याचे योग्य संकलन कसे करावे, याबाबतही घरोघरी
जाऊन जनजागृती केली जाणार आहे.
जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, स्थानिक ग्रामपंचायती, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी
सेविका तसेच विविध शासकीय विभागांच्या उत्कृष्ट समन्वयातून हे अभियान जिल्ह्यात अत्यंत
प्रभावीपणे तळागाळापर्यंत राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाने
या कल्याणकारी उपक्रमांमध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदवून आपले गाव आरोग्यदृष्ट्या सक्षम,
पूर्णपणे स्वच्छ व निरोगी बनविण्यासाठी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावे, असे जाहीर
आवाहन ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
000000000

Comments
Post a Comment