आयुक्त तुकाराम मुंढेंच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यात 'एफडीए'चे सलग धाडसत्र तब्बल ३.२२ कोटींचा साठा जप्त, १७ जणांना अटक गुटखा, भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि बेकायदेशीर 'इलेक्ट्रोलाइट ड्रिंक्स'वर अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई 7 गुन्हे दाखल करत 17 आस्थापने केली सील

 



 

          ठाणे दि.05(जिमाका):- अन्न सुरक्षा कायदा व नियमांची अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA), महाराष्ट्र राज्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यात धडक व सलग धाडसत्र राबविण्यात आले आहे. कोकण विभागातील अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी २ जून आणि ३ जून २०२६ रोजी ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर आणि भिवंडी या परिसरांसह इतर विविध भागांमध्ये अचानक तपासणी मोहिमा राबवून अन्न भेसळ करणाऱ्या आणि प्रतिबंधित अन्नपदार्थ विकणाऱ्या घटकांविरोधात प्रचंड मोठी कारवाई केली आहे. या दोन दिवसांच्या व्यापक मोहिमेत प्रशासनाने प्रतिबंधित अन्नपदार्थांसह एकूण ३ कोटी २२ लाख २४ हजार ६७२ रुपये किंमतीचा  प्रचंड मोठा साठा जप्त केला असून, एकूण १७ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 

            कोकण विभागाच्या पथकाने २ आणि ३ जून रोजी ठाणे, कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूर या ठिकाणी गुटखा, पानमसाला व सुगंधित सुपारी यांसारख्या आरोग्यास घातक व प्रतिबंधित अन्नपदार्थांविरोधात व्यापक मोहीम राबवली. या कारवाईदरम्यान एकूण १७ व्यावसायिक आस्थापनांवर कायदेशीर बडगा उगारण्यात आला. या धाडींमध्ये २ लाख ९५ हजार ६६० रुपये किमतीचा बेकायदेशीर गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि तत्सम प्रतिबंधित पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. या गंभीर प्रकरणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करत विविध पोलीस ठाण्यांमध्ये पुढील तपासासाठी एकूण ७ प्रथम खबरी अहवाल (FIR) दाखल करण्यात आले आहेत. तसेच बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या १७ व्यक्तींना पोलिसांनी अटक केली असून, नियम धाब्यावर बसवणाऱ्या सर्वच्या सर्व १७ आस्थापनांना प्रशासनाकडून तात्काळ सील ठोकण्यात आले आहे. 

            या मोहिमेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच २ जून २०२६ रोजी पथकाने नवी मुंबई परिसरातून लेबलदोष असलेले व भेसळीचा संशय असलेले ४७ हजार ५२० रुपये किमतीचे १४४ किलो खवा आणि ५५ हजार ६२० रुपये किमतीचे ६१८ किलो दही जप्त केले. याच दिवशी मीरा रोड परिसरातून लेबलदोष असलेला आणि भेसळीचा संशय असलेला 'न्यूट्रिला वेट गेन' (Nutrila Weight Gain) चा १२ हजार रुपये किमतीचा ६ किलोचा साठा हस्तगत करण्यात आला. याच धर्तीवर, अन्नपदार्थांवर 'इलेक्ट्रोलाइट ड्रिंक' सारख्या अघोषित वर्णनांचा आणि अस्वीकार्य उपचारात्मक दाव्यांच्या वापरास स्पष्ट प्रतिबंध करणाऱ्या एफएसएसएआय (FSSAI) मुख्यालयाच्या निर्देशानुसार भिवंडी परिसरात मोठी कारवाई करण्यात आली. तेथून 'रेडी टू सर्व्ह फ्रूट बेव्हरेजेस'च्या अंतर्गत येणाऱ्या इआरझेडएल (eRZL) ॲपल, प्लस ॲक्टिव्ह, रीहायड्रेट, ऑरेंज आणि रीहायड्रेट प्लस ऑरेंज या विविध फ्लेवर्सच्या पेय उत्पादनांचा तब्बल १६ लाख ५३ हजार ७१८ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. 

            कारवाईच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच ३ जून २०२६ रोजी अन्न व औषध प्रशासनाने आपली मोहीम अधिक तीव्र केली. नवी मुंबई परिसरातून लेबलदोष असलेले व भेसळीचा तीव्र संशय असलेले मिरची पावडर, हळद पावडर, अख्खा हिंग, मोठी इलायची, गरम मसाले आणि तीळ अशा दैनंदिन वापरातील विविध अन्नपदार्थांचा तब्बल ३८ हजार ५६.६ किलो ग्रॅम वजनाचा प्रचंड साठा जप्त करण्यात आला, ज्याची बाजारभावाप्रमाणे किंमत ७४ लाख ७९ हजार २६० रुपये इतकी आहे. याच दिवशी भिवंडी येथील कुकसे गावात एफएसएसएआयच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 'इआरझेडएल इलेक्ट्रोलाइट ड्रिंक' (ERZL Electrolyte drink) च्या लेमन, ऑरेंज, ॲपल, ॲडव्हान्स केअर आणि प्लस ॲक्टिव्ह या विविध फ्लेवर्सचा तब्बल २ कोटी २४ लाख २६ हजार ८७ रुपये पन्नास पैशांचा अवाढव्य साठा जप्त करण्यात आला. याशिवाय भाईंदर येथूनही २०० मिलीच्या टेट्रा पॅक्समध्ये उपलब्ध असलेला इआरझेडएल ॲडव्हान्स केअर इलेक्ट्रोलाइट ड्रिंक (रीहायड्रेट प्लस ॲपल, प्लस ॲक्टिव्ह) आणि इनरझाल ऑरेंज इलेक्ट्रोलाइट ड्रिंकचा एकूण १ लाख ८४ हजार ६०७ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. 

            अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या अंतिम आकडेवारीनुसार, या दोन दिवसांच्या कालावधीत २ लाख ९५ हजार ६६० रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व पानमसाला आणि इतर भेसळयुक्त व नियमबाह्य अन्नपदार्थांचा ३ कोटी १९ लाख २९ हजार १२ रुपये किमतीचा साठा मिळून एकूण ३ कोटी २२ लाख २४ हजार ६७२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून अशा प्रकारच्या धाड सत्रांची धडक मोहीम भविष्यातही अत्यंत तीव्रतेने आणि सातत्याने सुरू राहणार आहे, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी आणि प्रतिबंधित पदार्थांची १०० टक्के अंमलबजावणी करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन सह आयुक्त (अन्न), कोकण विभाग यांच्यातर्फे करण्यात आले आहे. या संदर्भातील कोणतीही तक्रार किंवा अन्न भेसळीची माहिती देण्यासाठी प्रशासनाने '१८००२२२३६५' हा टोल फ्री क्रमांक जाहीर केला असून नागरिक सह आयुक्त (कोकण विभाग), अन्न व औषध प्रशासन कार्यालय, वरदान एमआयडीसी बिल्डिंग, वागळे इस्टेट, ठाणे (पश्चिम) येथे थेट संपर्क साधू शकतात.

0000000000


Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ

“पत्रकारितेची पाठशाळा - बातमी मागची गोष्ट” कार्यशाळा ठाण्यात उत्साहात संपन्न