जिद्द, संघर्ष आणि यशाचा महामेरू रेल्वेतील सेवानिवृत्त अधिकारी लीलाताई वानखेडे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास
वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी
अचानक कोसळलेला दुःखाचा डोंगर, पदरी दीड आणि तीन वर्षांची दोन लहान मुले आणि हातात
केवळ इयत्ता सातवी पास असणारे शैक्षणिक प्रमाणपत्र; अशा अत्यंत कठीण परिस्थितीतून सुरू
झालेला भुसावळ येथील लीला दिनकर वानखेडे यांचा जीवनप्रवास आजच्या पिढीसाठी एका दीपस्तंभासारखा
मार्गदर्शक ठरला आहे. रेल्वेच्या डी.आर.एम. (DRM) ऑफिसमधून ऑफिस सुपरिटेंडेंट (OS)
म्हणून सेवानिवृत्त झालेल्या लीलाताईंनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेले यश
त्यांच्या अदम्य इच्छाशक्तीची साक्ष देते.
१९७९ मध्ये पतीच्या निधनानंतर लीलाताईंवर
दोन्ही मुलांच्या संगोपनाची आणि एकेरी पालकत्वाची मोठी जबाबदारी आली. शिक्षण कमी असल्यामुळे
सुरुवातीला पावलोपावली अडचणी आल्या. परंतु, पराभवाचा विचार न करता त्यांनी जिद्दीने
प्रयत्न सुरू ठेवले. १८ ऑक्टोबर १९८० रोजी त्यांना अनुकंपा तत्त्वावर रेल्वेमध्ये सेवा करण्याची
संधी मिळाली. नोकरी करत असतानाच त्यांनी कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून बाहेरून
इयत्ता दहावीची परीक्षा दिली आणि त्या यशस्वीपणे उत्तीर्ण झाल्या. शिक्षण पूर्ण
झाल्यावर त्यांना लिपिक (क्लार्क) म्हणून पदोन्नती मिळाली. संयुक्त कुटुंबाची
खंबीर साथ आणि आजूबाजूच्या स्नेहपरिवाराच्या सहकार्यामुळे त्यांनी ४५ वर्षांची
दीर्घ आणि निष्कलंक सेवा पूर्ण केली.
नोकरी आणि कुटुंबापुरते
मर्यादित न राहता लीलाताईंनी सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातही मोलाचे योगदान
दिले आहे. २०१३ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या लेखणीला आणि
समाजकार्याला नवी दिशा दिली. त्यांनी स्वतःच्या हाताने ज्ञानेश्वरी, गजानन विजय
ग्रंथ आणि भगवद्गीता यांचे लेखन केले असून, सध्या त्यांचा भागवत ग्रंथाचा सखोल अभ्यास
सुरू आहे. 'साहित्य मंच शहापूर' या ग्रुपच्या माध्यमातून त्या आजही चारोळ्या आणि
कविता लेखन यांसारख्या उपक्रमांमध्ये सक्रिय आहेत.
त्यांच्या या चौफेर
कर्तृत्वाची दखल घेऊन जागतिक महिला दिनी (८ मार्च) त्यांना विशेष पुरस्काराने
सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय, हरिओम संस्था विवाह मंडळ आणि महिला मंडळाच्या
माध्यमातून त्या अनेक गरजू कुटुंबांना वेळ, मानसिक बळ आणि आर्थिक सहकार्य करत
असतात. त्यांनी आपल्या आई-वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक पालखी देखील भेट दिली
आहे.
वयाच्या ७१ व्या वर्षीही त्यांचा उत्साह
तरुणांना लाजवणारा आहे. 'माधवबाग' वैद्यकीय चिकित्सालयाच्या उपचारांमुळे त्यांनी आपला
मधुमेह पूर्णपणे नियंत्रणात आणला असून, त्याविषयीचे प्रमाणपत्रही त्यांना मिळाले आहे.
त्यांच्या संस्कारांची शिदोरी घेऊन त्यांची दोन्ही मुले आज उच्च पदावर कार्यरत आहेत.
मोठा मुलगा कतार येथे आयटी क्षेत्रात तर लहान मुलगा मुंबई येथे रेल्वेमध्ये साहाय्यक
नियंत्रक (Asst. Control) म्हणून सेवेत आहे. "कार्य हे नेहमी सहकार्यानेच पूर्ण
होते," असा ठाम विश्वास बाळगणाऱ्या लीलाताई वानखेडे आजही नवीन लोकांशी मैत्री
करत, जुने बंध जपत आणि ईश्वरावरील गाढ श्रद्धेच्या बळावर आनंदी व ऊर्जावान आयुष्य जगत
आहेत.
00000000000

Comments
Post a Comment