राज्यात मान्सूनपूर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमेला युद्धपातळीवर प्रारंभ शंभर टक्के उद्दिष्टपूर्तीसाठी पशुसंवर्धन विभागाचे काटेकोर नियोजन

 



 

ठाणे,दि.11(जिमाका) :- पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पशुधनाला विविध संसर्गजन्य आजारांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने कंबर कसली आहे. राज्यात 'मान्सूनपूर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहीम' आता युद्धपातळीवर आणि व्यापक मोहीम स्वरूपात सुरू करण्यात आली असून, निश्चित केलेल्या लक्ष्यांकित उद्दिष्टांच्या शंभर टक्के पूर्तीसाठी विभागाने अत्यंत काटेकोर नियोजन केले आहे, अशी माहिती पशुसंवर्धन व दूग्धव्यवसाय सहआयुक्त पुणे यांनी दिली आहे.

पावसाळ्यात जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते व संसर्ग पसरण्याचा धोका वाढत असल्याने, ऐनवेळी येणारे संकट टाळण्यासाठी सर्व पशुपालकांनी आपल्या गाई, म्हशी, शेळ्या व मेंढ्यांचे मान्सूनपूर्व लसीकरण करून घ्यावे आणि जवळच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा. पावसाळ्यापूर्वी प्राण्यांमध्ये प्रामुख्याने होणाऱ्या घटसर्प (Haemorrhagic Septicaemia) व फऱ्या (Black Quarter) यांसारख्या अत्यंत घातक आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीची गुणवत्ता टिकून राहणे गरजेचे असते. त्यादृष्टीने लसीचा प्रभाव उत्तम राहण्यासाठी राज्यस्तरापासून ते थेट ग्रामीण भागातील उपकेंद्रांपर्यंत लस पोहोचवताना आवश्यक तापमान राखले जाईल, यासाठी अद्ययावत कोल्ड बॉक्सचा वापर करून शीतसाखळी व्यवस्थापन (कोल्ड चेन) चोख ठेवण्यात आले आहे.

ही मोहीम यशस्वी करण्यासाठी पशुसंवर्धन आयुक्तालयामार्फत करण्यात आलेल्या सूक्ष्म नियोजनाअंतर्गत जिल्हा व तालुका पातळीवर आवश्यकतेनुसार लसींचा पुरेसा साठा आधीच वितरित करण्यात आला आहे. पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची विशेष पथके तयार करण्यात आली असून, ती प्रत्यक्ष गावागावांत व गोठ्यांपर्यंत पोहोचून 'डोअर स्टेप' (घरपोच) पद्धतीने लस टोचणी करत आहेत. यामध्ये एकाही जनावराचे लसीकरण सुटणार नाही, याची काटेकोर दक्षता घेण्याच्या सूचना क्षेत्रीय यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. 

यावेळच्या लसीकरण मोहिमेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे लसीकरणाचे पारदर्शक डिजिटल ट्रॅकिंग केले जात आहे. आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी सर्व पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत की, प्रत्येक पशुधनाला लस टोचल्यानंतर त्याची नोंद 'भारत पशुधन प्रणाली' (NDLM Portal) या केंद्र सरकारच्या अधिकृत पोर्टलवर रिअल-टाइम म्हणजेच तात्काळ करणे आवश्यक आहे.

पशुधनाचे टॅगिंग करून म्हणजेच १२ अंकी बिल्ला लावूनच ही नोंदणी केली जात आहे, जेणेकरून मोहिमेच्या प्रगतीवर थेट देखरेख ठेवता येईल व बोगस नोंदींना पूर्णपणे आळा बसेल. पशुधनाच्या आरोग्याविषयी अधिक माहितीसाठी किंवा कोणत्याही आजारावर घरपोच उपचारासाठी पशुपालक '१९६२' या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

 

000000000000


Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ

“पत्रकारितेची पाठशाळा - बातमी मागची गोष्ट” कार्यशाळा ठाण्यात उत्साहात संपन्न