ठाणे ग्रामीण जिल्ह्यात १६ ते ३० जून दरम्यान मनाई आदेश लागू कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

 



 

ठाणे दि.16 (जिमाका) :- ठाणे ग्रामीण जिल्हा कार्यक्षेत्रात शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच आगामी सण-उत्सव व परीक्षांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) नुसार प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून त्यांनी संपूर्ण ठाणे ग्रामीण भागात दिनांक १६ जून २०२६ रोजीचे ००.०१ वाजल्यापासून ते दिनांक ३० जून २०२६ रोजीचे २४.०० वाजेपर्यंत जमावबंदी व मनाई आदेश लागू केले आहेत. या कालावधीत जिल्ह्यातील शांतता भंग होऊ नये आणि समाजकंटक व गुंड प्रवृत्तीच्या इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे सोयीचे व्हावे, या उद्देशाने प्रशासनाकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

या मनाई आदेशांमागे जिल्ह्यातील विविध राजकीय घडामोडी आणि आगामी धार्मिक व शैक्षणिक उपक्रम कारणीभूत आहेत. ठाणे ग्रामीण जिल्ह्यात सध्या विविध राजकीय पक्ष व संघटनांकडून वेगवेगळ्या मागण्यांसाठी मोर्चे, रॅली, धरणे आणि उपोषणे यांसारखी आंदोलने केली जात आहेत. त्यातच दिनांक १६ जून २०२६ पासून इयत्ता १० वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा सुरू होत असून, या परीक्षांसाठी शहापूर-०१ आणि मुरबाड-०१ अशी एकूण २ परिक्षण केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. याशिवाय मुस्लिम बांधवांचा पवित्र मोहरम सण देखील याच काळात साजरा होणार असून, दिनांक १७ जून ते २५ जून २०२६ या कालावधीत जिल्ह्यात ०७ पंजे, ०४ ताबूत आणि १६ ताजिया अशा एकूण १७ प्रतिष्ठापना केल्या जाणार आहेत, तर दिनांक २६ जून २०२६ रोजी एकूण ०८ विसर्जन मिरवणुकांचे आयोजन होणार आहे. या सर्व संवेदनशीलता लक्षात घेता कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हे कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या या आदेशानुसार निश्चित केलेल्या कालावधीत अनेक गोष्टींवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. त्यानुसार शस्त्रे, तलवारी, भाले, दंडे, सोटे, बंदुका, सुरे, लाठ्या-काठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बाळगण्यास सक्त मनाई आहे. तसेच कोणताही क्षारक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ सोबत नेणे, दगड किंवा क्षेपणास्त्रे फेकण्याची साधने बाळगणे अथवा जमा करणे यावर बंदी असेल. सार्वजनिक ठिकाणी व्यक्तींच्या प्रेताकृती किंवा प्रतिमांचे प्रदर्शन करणे, मोठ्याने ओरडणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजवणे, सभ्यता व नीतिमत्तेला धक्का पोहचेल अशी भाषणे, हावभाव किंवा चित्रे-फलक तयार करणे व त्यांचा प्रसार करणे याला कायद्याने प्रतिबंध करण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे आणि घोषणा अथवा प्रतिघोषणा देणे यांसारख्या कृत्यांवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे.

हा मनाई आदेश सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी असला, तरी यातून काही अपवादात्मक बाबींना व व्यक्तींना सवलत देण्यात आली आहे. त्यानुसार कर्तव्यावर असणारे सरकारी नोकर, वरिष्ठांच्या आदेशानुसार शस्त्र बाळगणे आवश्यक असलेले कर्मचारी किंवा सक्षम अधिकाऱ्यांनी सूट दिलेल्या व्यक्तींना हा नियम लागू असणार नाही. त्याचप्रमाणे लग्न कार्यासाठी जमलेले लोक, अंत्यसंस्कार व प्रेतयात्रेसाठी काढण्यात आलेल्या मिरवणुका, न्यायालय किंवा सरकारी-निमसरकारी कार्यालयांच्या कामासाठी जमलेले लोक, शैक्षणिक संस्था अथवा धार्मिक संस्थांच्या ठिकाणी जमलेला समुदाय यांना यातून वगळण्यात आले आहे. याशिवाय जिल्हादंडाधिकारी किंवा पोलीस अधीक्षक यांनी स्वतः परवानगी दिलेल्या सभा व मिरवणुका तसेच सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचारी ज्या ठिकाणी कर्तव्य पार पाडत आहेत, अशा ठिकाणांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे.

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, दिनांक १५ जून २०२६ रोजी स्वाक्षरी व शिक्क्यासह निर्गमित करण्यात आलेला हा आदेश दिलेल्या संपूर्ण कालावधीत काटेकोरपणे लागू राहील. जर कोणत्याही व्यक्तीने किंवा गटाने या आदेशाचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५ प्रमाणे कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.

00000000000000


Comments