ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात जमावबंदी आणि मनाई आदेश लागू आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा निर्णय
ठाणे, दि.१६(जिमाका) :- आगामी काळात येणारे विविध सण, उत्सव, जयंती आणि राजकीय-सामाजिक संघटनांकडून होणारी
आंदोलने लक्षात घेता ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था
अबाधित राखण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. याचाच एक भाग म्हणून ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या
हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम
३७ पोट कलम (१) व (३) अन्वये मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत.
हा मनाई
आदेश १९ जून २०२६ रोजी रात्री ००.०१ वाजेपासून ते ३ जुलै २०२६ रोजी रात्री २४.०० वाजेपर्यंत संपूर्ण ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात अमलात राहणार आहे.
या कालावधीत
अनेक महत्त्वाचे सण, उत्सव आणि विशेष दिवस साजरे होणार आहेत. यामध्ये २१ जून २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन, २४ जून २०२६ रोजी बजरंग दल स्थापना
दिन, २६ जून २०२६ रोजी मोहरम (ताजिया यौमे आशुरा) ताबूत विसर्जन आणि राजर्षी
छत्रपती संभाजी महाराज जयंती (तिथीप्रमाणे) तसेच शाहू महाराज जयंती साजरी होणार
आहे. यासोबतच २७ जून २०२६ रोजी किल्ले रायगड येथे शिवराज्याभिषेक दिन
(तिथीप्रमाणे), २९ जून २०२६ रोजी वटपौर्णिमा व कर्नाटकचा बेंदूर आणि ३० जून २०२६
रोजी गुरु हरगोविंदसिंह जयंती यांसारखे सण व उत्सव होणार आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि जीवित
व वित्त सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाकडून हे प्रतिबंधात्मक पाऊल उचलण्यात आले आहे.
या मनाई आदेशानुसार
ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात शस्त्रे, सोते, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, लाठ्या-काठ्या
किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर वाहून नेणे, बाळगणे,
जमा करणे व तयार करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय दगड, क्षेपणास्त्रे
किंवा फेकावयाची उपकरणे व साधने जवळ बाळगणे, कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ आणि
द्रव सोबत बाळगणे यावरही प्रतिबंध असेल. सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे,
वाद्य वाजविणे, कोणत्याही व्यक्तीच्या चित्राचे किंवा प्रतीकात्मक प्रेताचे अथवा पुढाऱ्यांच्या
चित्राचे/प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच सभ्यता आणि
नितिमत्ता यास धोका पोहोचेल किंवा राज्यातील शांतता धोक्यात येईल अशा प्रकारची भाषणे,
हावभाव, चित्रफलक प्रदर्शित करण्यास आणि पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे,
जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे, घोषणा व प्रतिघोषणा देणे यांसारख्या कृत्यांवर कायदेशीर
बंदी घालण्यात आली आहे.
तथापि, या आदेशातून
काही महत्त्वपूर्ण बाबींना आणि घटकांना सूट देण्यात आली आहे. हा मनाई आदेश सरकारी नोकर,
वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य बजावणारे पोलीस व सुरक्षा कर्मचारी किंवा सक्षम अधिकाऱ्याने
सूट दिलेल्या व्यक्तींना लागू असणार नाही. त्याचप्रमाणे विवाह कार्यासाठी जमलेले लोक,
प्रेतयात्रा व अंत्यसंस्कारासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुका, सरकारी किंवा निमसरकारी
कामासाठी कोर्ट व कचेऱ्यांच्या ठिकाणी जमलेले लोक, सरकारी आणि शैक्षणिक संस्था या ठिकाणी
जमलेला जनसमुदाय यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे. तसेच पोलीस आयुक्त व त्यांनी
प्रदान केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी विशेष परवानगी दिलेल्या सभा किंवा मिरवणुका आणि
सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचारी ज्या ठिकाणी कर्तव्य पार पाडत आहेत, त्या ठिकाणांना
या आदेशातून सूट देण्यात आली आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५ प्रमाणे कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल,
असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
0000000000
Comments
Post a Comment